शहराबाहेरील रुग्णांचा पालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेवर ताण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय सेवा इतर महापालिकांच्या तुलनेने चांगल्या आहेत. शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागासह राज्यातील कानाकोपर्यातून रुग्ण दाखल होत असतात. बाहेरील रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागावर ताण येत आहे.
महापालिकेच्या रुग्णालयात २०२४ मध्ये बाह्यरुग्ण विभागात तब्बल १६ लाख १० हजार, तर आंतररुग्ण विभागात ८९ हजार रुग्णांनी उपचार घेतले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीबाहेरील सरासरी २५ टक्के रुग्ण असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे हद्दीबाहेरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारने महापालिकेला आर्थिक मदत करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार १ हजार लोकसंख्येमागे ३ खाटा बंधनकारक आहेत. त्यानुसार ३० लाखांच्या लोकसंख्येला ९ हजार खाटा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यानुसार महापालिकेच्या रुग्णालयांत सोय केली आहे. वैद्यकीय विभागाने शहरातील आठ मोठ्या रुग्णालयांपैकी वायसीएम, आकुर्डी, भोसरी, जिजामाता आणि थेरगाव या पाच रुग्णालयांतील रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास केला आहे. यामध्ये वायसीएम रुग्णालयामध्ये २०२४ मध्ये हद्दीतील बाह्यरुग्ण विभागामध्ये ६ लाख ६९३, आंतररुग्ण विभागात ३३ हजार ९९, हद्दीबाहेरील बाह्यरुग्ण विभागात १ लाख ३६ हजार २९९, तर आंतररुग्ण विभागात १३ हजार ३६६ रुग्णांनी उपचार घेतले आहेत.
हेही वाचा – गुडन्यूज! घरकुलासाठी मोफत मिळणार वाळू; महसूलमंत्र्यांची घोषणा
महापालिकेच्या चार रुग्णालयातील रुग्ण संख्येची टक्केवारीमध्ये आकडेवारी काढण्यात आली आहे. २०२४-२५ मध्ये आकुर्डी रुग्णालयात हद्दीतील (७७.१०), हद्दीबाहेरील (२२.२०), भोसरी रुग्णालयात हद्दीतील (६७.१०), हद्दीबाहेरील (३२.२०), जिजामाता रुग्णालय हद्दीतील (८०.१०), हद्दीबाहेरील (१९.९०), थेरगाव रुग्णालयात हद्दीतील (७१.६०), हद्दीबाहेरील (२८.४०) अशा प्रमाणे रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
महापालिकेच्या वतीने शहरातील वैद्यकीय सुविधा सुधारवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. रुग्णालयांमध्ये दर्जेदार सोयी-सुविधा देण्यासाठी नवीन उपकरणे खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. दरवर्षी महापालिका वैद्यकीय सुविधांसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांचा खर्च करत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
महापालिकेच्या पाच मोठ्या रुग्णालयातील हद्दीतील व हद्दीबाहेरील रुग्णांच्या आकडेवारीचा वैद्यकीय विभागाने अभ्यास केला आहे. यामध्ये सरासरी हद्दीतील ७५ टक्के, तर हद्दीबाहेरील २५ टक्के रुग्ण महापालिका रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. त्याचा ताण महगापालिका रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेवर आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी- चिंचवड महापालिका