Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे महापालिकेचे आता ‘मिशन १७’; पथ विभागाने जाहीर केला नवा उपक्रम

पुणे : शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेची ख्याती राष्ट्रपती कार्यालयापर्यंत पोहोचली आहे. शहरातील रस्त्यांवरून मार्ग काढत प्रवास करणे म्हणजे दिव्य मानले जात होते. याचा त्रास राष्ट्रपतींना करावा लागला होता. त्यानंतर मात्र महापालिकेच्या पथ विभागाने शहरातील रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्याचे धोरण हाती घेतले आहे. शहरातील प्रमुख १५ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर आता महापालिकेने आता आणखी नव्याने १७ रस्त्यांची निवड करण्यात आली असून यावरील अतिक्रमणे हटवून, चेंबर दुरुस्ती, ग्रेड सेपरेटरची कामे केली जाणार आहे

महापालिकेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदारांच्या उपस्थितीत शहरातील विविध प्रकल्पांची आढावा बैठक घेत शहरातील अतिक्रमण कारवाईसह ३० जानेवारीपर्यंत शहरातील प्रमुख १५ रस्ते पूर्णपणे रिसरफेसिंग करण्यासोबत रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याच्याही सूचना केल्या होत्या. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील रस्त्यांवर केलेल्या पॅच वर्कवर नाराजी व्यक्त केली होती. शहरातील रस्ते चांगलेच असले पाहिजेत त्यासाठी जेवढा जास्तीत जास्त निधी मंजूर करता येईल तेवढा करा आणि शहरातील रस्ते खड्डे विरहित आणि पॅचमुक्त करा, असे निर्देशही त्यांनी दिले होते. त्यानुसार पथ विभाग गेल्या काही दिवसांपासून चांगलाच कामाला लागला होता. रस्ते खरवडून काढून त्यावर डांबरीकरण करण्याचे काम वेगाने पूर्ण करण्यात पथ विभागाला यश मिळाले आहे. राहिलेली कामे अवघ्या काही दिवसात पूर्ण होतील, तर रंगरंगोटीची कामेही केली जाणार आहेत. यामुळे आता शहरातील वाहतुकीचा वेग वाढणार असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा –  भास्कर जाधव यांचे नाराजीच्या चर्चांवर स्पष्टीकरण; म्हणाले, “संधी मिळाली नाही ही वस्तुस्थिती…”

शहरातील ज्या रस्त्यांचा वापर सर्वात अधिक होतो, अशा रस्त्यांची पथ विभागाने पहिल्या टप्प्यात ‘मिशन १५’अंतर्गत निवड केली होती. या रस्त्यांवरील वाहतुकीला वेग मिळावा, यासाठी आवश्यक सर्व सुधारणा या उपक्रमांतर्गत करण्यात येत आहेत. त्यात प्रामुख्याने अतिक्रमणे काढून रस्त्यांची डागडुजी, त्यावर डांबरीकरण करून रस्ते विकसित केले जातात. त्यानुसार महापालिकेने पहिल्या टप्प्यात हाती घेतलेल्या १५ रस्त्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. त्यानंतर आता आणखी नव्याने १७ रस्त्यांची निवड करण्यात आली असून, या रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवून, चेंबर दुरुस्ती, अनावश्यक ठिकाणचे ग्रेड सेपरेटर काढून त्यांचे नव्याने डांबरीकरण केले जाणार आहे, असे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी  सांगितले.

‘मिशन १७’अंतर्गत निवड केलेल्या सर्व रस्त्यांचा आता सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. या रस्त्यांवरील कोणकोणत्या बाबींवर कामे करावी लागणार आहेत, त्याची यादी करण्यात येत असून त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. त्यामुळे शहरातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारून वाहतुकीला गती मिळणार असल्याचेही पावसकर यांनी सांगितले.

‘मिशन १७’मधील रस्ते

कात्रज-मंतरवाडी बायपास, सासवड रस्ता, जुना एअरपोर्ट रस्ता, आळंदी रस्ता, जुना पुणे-मुंबई हायवे, शास्त्री रस्ता, नेहरू रस्ता, टिळक रस्ता, साधू वासवानी रस्ता, बंडगार्डन रस्ता, डॉ. आंबेडकर रस्ता, एम. जी. रस्ता, प्रिन्स ऑफ वेल्स रस्ता, कोंढवा मुख्य रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सेनापती बापट रस्ता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button