जर तुम्ही रात्री प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ‘या’ ५ गोष्टी ठेवा लक्षात
रात्रीच्या प्रवासाचे स्वतःचे फायदे असले तरी, त्याशी संबंधित काही धोके देखील आहेत

पुणे : रात्री प्रवास करणे अनेक लोकांसाठी खूप आरामदायी असते. कारण आपल्यापैकी असे काही लोकं असतात, ज्यांना गावी जाताना किंवा इतर लांब ठिकाणी जाण्यासाठी रात्रीचा प्रवासाला जास्त करून प्राधान्य देतात. कारण रात्रीच्या वेळेस बहुतेक रस्ते रिकामे असतात, रहदारी कमी असते आणि प्रवास दिवसापेक्षा लवकर पूर्ण करता येतो. त्यामुळे वेळ वाचतो आणि उन्हाळ्यात दिवसाच्या कडक उन्हापासून बचाव होतो. पण रात्रीच्या प्रवासाचे स्वतःचे फायदे असले तरी, त्याशी संबंधित काही धोके देखील आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
रात्रीच्या प्रवासात सर्वात मोठे आव्हान म्हणजे सुरक्षितता. अंधारात रस्त्यावर कमी प्रकाश असल्याने अपघातांची शक्यता वाढते. जर तुम्ही रात्री प्रवास करण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून तुमचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होईल. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच 5 टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या रात्रीच्या प्रवासात पाळल्या पाहिजेत.
प्रवास करण्यापूर्वी पुरेशी झोप घ्या
रात्री प्रवास करताना थकवा आणि झोप येणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. जर तुम्ही स्वतः गाडी चालवत असाल तर प्रवासापूर्वी किमान 6-8 तास चांगली झोप घ्या. जर तुम्ही पुरेशी झोप घेतली तर तुम्ही सतर्क राहाल आणि अपघातांचा धोका कमी होईल. त्याच वेळी तुमचा प्रवास हा लांबचा असेल तर मध्येच ब्रेक घ्यायला विसरू नका. जर तुम्ही खूप थकलेले असाल तर दुसऱ्याला गाडी चालवायला द्या किंवा पब्लिक ट्रांसपोर्टने प्रवास करा.
संपूर्ण मार्ग माहिती आणि नेव्हिगेशन मिळवा
रात्रीच्या प्रवासादरम्यान सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे तुम्ही जात असलेल्या मार्गाबद्दल योग्य माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून, जेव्हाही तुम्ही रात्री प्रवास करता तेव्हा GPS नेव्हिगेशन चालू ठेवा आणि बॅकअपसाठी ऑफलाइन मॅप डाउनलोड करा. शक्य असल्यास तुम्ही जात असलेल्या रस्त्याबद्दल आधीच अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला अज्ञात ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही. त्याच वेळी, जर तुम्ही निर्जन रस्त्यांवरून जात असाल, तर तुमचे ठिकाण आणि प्रवासांची माहिती आणि लोकेशन एखाद्या विश्वासू व्यक्तीसोबत शेअर करा.
हेही वाचा – थकबाकीदारांवर कारवाई सुरूच राहणार, ३१ मार्च पूर्वी कराचा भरणा करून जप्तीची कारवाई टाळा; महापालिकेचे आवाहन
कार किंवा बाईकची स्थिती तपासा
रात्री प्रवास करताना तुमची गाडी चांगल्या स्थितीत असणे खूप महत्वाचे आहे. प्रवास करण्यापूर्वी तुमच्या गाडीची नीट तपासणी करा. हेडलाइट्स आणि इंडिकेटर व्यवस्थित काम करत आहेत की नाही. ब्रेक आणि टायर प्रेशर योग्य स्थितीत आहेत की नाही. इंधनाची टाकी भरली आहे की नाही. तसेच अतिरिक्त टायर, जॅक, टॉर्च आणि टूलकिट सोबत ठेवा. जर तुम्ही बाईकने प्रवास करत असाल तर रात्री समोरच्या गाड्यांना दिसण्यासाठी तसेच व्हिजिबिलीटीसाठी हेल्मेट आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट घाला.
सुरक्षित ठिकाणी थांबा
रात्री प्रवास करताना तुम्हाला अनेक वेळा विश्रांती घ्यावी लागू शकते, परंतु राहण्यासाठी नेहमीच सुरक्षित ठिकाणे निवडा. निर्जन ठिकाणी वाहन थांबवणे टाळा. फक्त पेट्रोल पंप, टोल प्लाझा किंवा महामार्गावरील कोणत्याही चांगल्या विश्रांतीच्या ठिकाणी थांबा. जर तुम्ही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत असाल तर स्टेशन किंवा बस स्टँडवर अधिक सतर्क रहा.
तुमचा मोबाईल आणि इतर आवश्यक वस्तू तुमच्यासोबत ठेवा.
रात्रीच्या प्रवासात मोबाईल हा तुमचा सर्वात मोठा आधार आहे. म्हणून, तुमच्या मोबाईलची बॅटरी पूर्णपणे चार्ज ठेवा आणि पॉवर बँक सोबत ठेवा. कुटुंबातील सदस्यांचे, पोलिसांचे, रुग्णवाहिकेचे आणि रस्ते मदतीचे आपत्कालीन क्रमांक मोबाईल स्क्रिनवर सेव्ह करून ठेवा. अनेक ठिकाणी डिजिटल पेमेंटचा पर्याय नसल्याने रोख रक्कम आणि कार्ड दोन्ही सोबत ठेवा. जर तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुमचे लाईव्ह लोकेशन तुमच्या विश्वासू व्यक्तीसोबत शेअर करा.