दुधिवरे खिंडीसह खिंडीतून प्रवास अवघड!
दरड कोसळण्याची शक्यता; खिंडीचे डागडूजी अद्यापही कागदावर

लोणावळा : लोणावळा-पवनानगर-पौड मार्गावरील डोंगर पठारावर पर्यटकांचे आकर्षण असलेली आणि सध्या सेल्फी व प्री वेडींगचे पॉईंट बनलेली दुधिवरे खिंड हि अत्यंत धोकादायक झाली आहे. खिंडीत कोणत्याही क्षणी मोठी दरड कोसळून मोठी दुर्घना घडण्याची दाट शक्यता आहे. मागील काही वर्षांपासून सातत्याने कोसळणाऱ्या दरडींमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन खिंडीतून प्रवास करावा लागत आहे. मागील काही वर्षांपासून स्थानिक आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन खिंडीतून प्रवास करावा लागत आहे. खिंडीची डागडुजी करून हा रस्ता रूंद करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.
लोणावळ्यापासून आठ किलोमीटर अंतरावर लोहगड किल्ल्याकडे जाताना लोणावळा-पवनानगर मार्गावर डोंगरात दुधिवरे खिंड आहे. ही खिंड अतिशय अरूंद असून, मागील काही वर्षापासून अत्यंत धोकादायक बनली आहे. दर वर्षी उन्हाळ्यात विशेषतः पावसाळ्यात खिंडीतील सुट्टे दगड-गोटे, छोटी मोठी झाडे आणि ढिसूळ मुरूम, मातीची दरड रस्त्यात कोसळते. मार्गालगतची अनेक झाडे आणि दरड केव्हाही कोसळतील, अशी भीती आहे. मात्र या मार्गाची देखभाल करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला या बाबत कोणतेच सोयरसूतक नसल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे. पावळ्यापूर्वीची देखभाल आणि दुरूस्तीची कामे कित्येक वर्षात करण्यात आलेली नाहीत. रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी काढले जात नसल्याने रस्त्यासाठी खर्चलेल्या लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. रस्त्यावर साचणाऱ्या आणि वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असून, अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडून रत्याची चाळण झाली आहे. यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे ठेकेदारी पध्दतीने रस्ते बनविताना कामाची पाहणी न करणे आणि वेळोवेळी दुर्लक्ष करणे कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
हेही वाचा – ‘धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला, त्यांना मनःशांती मिळेल’; पंकजा मुंडे
देखभाल दुरुस्तीसाठी एकमेकांकडे बोट
खिंडीत अदयाप कोणतेही धोका दर्शक सूचना फलक लावले नसल्याने पर्यटक येथे जीवाची पर्वा न करता बिनधास्त छायाचित्र व सेल्फी काढतात. या खिंडीचा परिसर हा वनविभागाच्या अखत्यारीत असून, तर लोणावळा-,पवनानगर-पौड रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी एकमेकांकडे बोट दाखवत ढकलली जात आहे.
सेल्फी, व्हिडिओसाठी जीव धोक्यात
याठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना दुधीवरे खिंड आकर्षणाचे ठिकाण वाटते. याठिकाणी पर्यटक सेल्फी काढण्यासाठी वाहने घेऊन उभे राहत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. दरडींचा धोका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना याठिकाणी न थांबण्याचा इशारा देत याठिकाणी सेल्फीसाठी घेण्यास बंदी घालत पर्यटकांनी पावसाळ्याचा आनंद घेण्याबरोबरच सावधगिरी बाळगण्याच्या सूचना केल्या होत्या स्थानिक प्रशासनाने केल्या आहेत मात्र पर्यटक जीव धोक्यात घालून सेल्फी, रील बनवत असल्याचे दिसून आले आहे.