अनिकेत तटकरेंच्या विजयावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या?

Sunetra Pawar : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जून रोजी संपल्यानंतर राज्यातील पाच जागांवरील निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ, पुणे आणि चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अनिकेत तटकरे यांचे अभिनंदन केले
सुनेत्रा पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, “कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. जनतेचा विश्वास संपादन करत कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रभावीपणे कार्य करावे, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा.”
दरम्यान, अनिकेत तटकरे यांनीही आपल्या निवडीबद्दल महायुतीतील सर्व वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे तसेच महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानले.
हेही वाचा – आता मागेल त्याला कृषीपंप; राज्यात १० लाखांहून अधिक लाभार्थी…
काय म्हणाले अनिकेत तटकरे?
“ही निवड माझ्यासाठी केवळ सन्मान नसून जनतेप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारी आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहीन,” असे तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
‘या’ पाच ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी
१ वर्धा : गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी, भाजप
२ पुणे: विक्रम काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस
३ ठाणे : रवींद्र फाटक, शिवसेना
४ रायगड-रत्नागिरी सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
५ यवतमाळ: दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना
उर्वरित १२ ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार असून कोण विजयी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.





