“केशव माधव न्यास” तर्फे ‘ऑपरेशन सिंदूर’- पराक्रम अभूतपूर्व या विषयावर व्याख्यान
एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त), विंग कमांडर अविनाश मुठाळ (निवृत्त) यांचा सहभाग

पुणे | केशव माधव न्यास च्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर’चे विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी दिनांक २४ मे रोजी सायंकाळी पटवर्धन बाग येथील ‘सेवा भवन’ सभागृहात करण्यात आले होते. पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदुर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले व सुमारे शंभर अतिरेक्यांचा खात्मा केला या ऑपरेशन सिंदुर पराक्रम अभूतपूर्व’या विषयावर अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे अध्यक्ष व परम विशिष्ट सेवा मेडल प्राप्त एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) बोलत होते. ते पुढे म्हणाले, जगातील पहिले टॅक्टिकल युद्ध आपण जिंकले. संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक शस्त्रास्त्रे यांचा योग्य वापर, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या दहशतवादी तळांवर अचूक हवाईहल्ले केले व आपल्या भारतीय सैन्याचे विराट शौर्य साऱ्या जगाला दाखवून दिले.ते पुढे म्हणाले की”भारताने स्वदेशी शस्त्रांनी दाखविलेली प्रभावी कामगिरी ही या धोरणाची यशोगाथा आहे.
ऑपरेशन सिंदुर हे शीर्षक देखील योग्य ठरवले गेले. या मोहिमेत भारताने अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने आणि स्वदेशी बनावटीची संरक्षकप्रणाली यांचा प्रभावी वापर केला. पाकिस्तानने वापरलेली चिनी व तुर्की बनावटीची यंत्रणा भारतीय तंत्रज्ञानापुढे टिकू शकली नाही. भारताच्या S 400, आकाश, आकाशतीर आणि ब्रह्मोस या प्रणालींनी सर्व हल्ले अडवले. आकाशतीर ही भारतात बनलेली, अत्याधुनिक स्वयंचलित सुरक्षाप्रणाली यावेळी विशेष चर्चिली गेली.ह्या तंत्रज्ञानामुळे शत्रूंचे हल्ले थोपविले तसेच संपूर्ण जगाला भारतीय सैन्यदलांच्या शौर्याचे दर्शन घडवले गेले.”
हेही वाचा : सांगली | चांदोली धरणग्रस्तांना निर्वाह भत्ता मंजूर; 40 वर्षांनी मिळाला न्याय!
विंग कमांडर अविनाश मुठाळ (निवृत्त) ह्यांनी PPT द्वारे ऑपरेशन सिंदुर ह्याची माहिती प्रभावी शैलीत उलगडून दाखवली व अभ्यासपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. विंग कमांडर अविनाश मुठाळ म्हणाले की,”ऑपरेशन सिंदुर जागतिक सर्वोत्तम युद्धांपैकी एक असून आत्मनिर्भर भारत अंतर्गत शस्त्रांची मारक क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. भारताने ऑपरेशन सिंदुर मार्फत ‘सायकॉलॉजिकल व इन्फॉर्मेशन वॉर फेअर’ चे उत्तम दर्शन घडवले. कर्नल सेफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यामार्फत युद्धाची अद्ययावत माहिती देऊन पाकिस्तानवर दबाव आणला व त्यांचा अजेंडा हाणून पडला. आपली इंटिग्रेटेड डिफेन्स सिस्टीम एकदम मजबूत असल्याने त्यांनी केलेले सर्व हल्ले आपण परतावून लावले. त्यांच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उध्वस्त केले तसेच सुमारे शंभर अतिरेक्यांचा खात्मा केला.व पाकिस्तानला नामोहरम केले. यामुळे जागतिक संरक्षण बाजारपेठेमध्ये आपल्या शस्त्रांची मागणी वाढलेली आहे”असेही ते पुढे म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव माधव न्यासचे अध्यक्ष सदानंद भागवत हे होते. भारतीय सैन्याच्या शौर्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा व्याख्यान आयोजनाचा उद्देश होता. ह्या व्याख्यानास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्वेनगरचे संघचालक उदयन पाठक, अविनाश वजल, डॉ सुनील पुणतांबेकर, बाळकृष्ण काळे, डॉ सतीश जोशी ह्यांच्यासह राज्यातील अनेक पूर्व सैन्याधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रारंभी केशव माधव न्यासचे सचिव अरविंद देशपांडे ह्यांनी संस्थेच्या केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. अध्यक्ष सदानंद भागवत ह्यांचे हस्ते एअर मार्शल प्रदीप बापट यांचा तर अरविंद देशपांडे यांचे हस्ते विंग कमांडर अविनाश मुठाळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्र संचलन केशव माधवचे विश्वस्त योगेश कुलकर्णी यांनी केले. प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.