माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या तयारीसाठी गुरूवारी आळंदीत 8 तास वीजपुरवठा बंद! महावितरणचे ग्राहकांना सहकार्याचे आवाहन

आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याच्या तयारीसाठी आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामानिमित्त गुरुवारी (17 एप्रिल 2025) सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत आळंदी परिसरातील संपूर्ण वीजपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणने सर्व ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आळंदी महावितरणचे सहायक अभियंता पाटील यांनी ही माहिती दिली. दरम्यान, 6 जुलै रोजी आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) असून 19 जून रोजी माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
हेही वाचा – तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी दोन समित्यांची स्थापना, मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
आषाढी वारी हा महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचा श्रद्धेचा सोहळा आहे. या काळात आळंदी येथे प्रस्थान सोहळ्याला भाविकांची प्रचंड गर्दी असते. यावेळी वीजपुरवठा खंडित होऊ नये आणि सुरक्षित राहावा, यासाठी महावितरणने आधीच देखभाल आणि दुरुस्तीचे नियोजन केले आहे. या कामात वीज वाहिन्यांची तपासणी, ट्रान्सफॉर्मरची देखभाल, तारा आणि उपकरणांची दुरुस्ती यांसह आवश्यक कामांचा समावेश आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी वीजपुरवठा बंद ठेवणे आवश्यक आहे, असे महावितरणने स्पष्ट केले.
महावितरणने सर्व ग्राहकांना या नियोजित वीज खंडितीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील दिली आहे. विशेषतः व्यापारी, उद्योजक, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना त्यांच्या गरजेनुसार पर्यायी व्यवस्था करावी, असे सुचवण्यात आले आहे.





