‘निवडणुकीचे कामकाज काटेकोरपणे व्हावे’; जिल्हाधिकारी डॉ. दिवसे

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाने जबाबदारीने कामे करावीत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुलभतेने पार पाडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि नियमांचा वारंवार अभ्यास करावा.
कोणत्याही कामात निष्काळजीपणा करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी रांगा लागू नयेत, याची विशेषत: काळजी घ्यावी. सर्व मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, निवडणूक विषयक सर्व समन्वय अधिकारी, संबंधित विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते.
हेही वाचा – जन्मसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांनी केली विधानसभा उमेदवाराची घोषणा
डॉ. दिवसे म्हणाले, प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण सत्र आयोजित करावेत. जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखड्यातील वेळापत्रकाप्रमाणे कामे करावीत.निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक विषयक कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून चोखपणे जबाबदारी पार पाडावी.
यशदा येथे दि. ७ ते ११ ऑक्टोबर या काळात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रत्येक मतदान केंद्राची पाहणी करावी.मतदान केंद्र सर्व सोयी सुविधेसह सज्ज आहेत की नाही याची खात्री करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती मोहीम राबवावी. नो युवर पोलिंग स्टेशन, यासारखे अभियान राबवून मतदान जनजागृती करावी. नवीन मतदान केंद्राबाबत मतदारांना अवगत करावेईव्हीएम मशीन जागरूकता कार्यक्रम योग्य रितीने राबवावा. इत्यादी बाबीवर विशेष लक्ष केंद्रित करून स्वीप व्यवस्थापन कक्षाने जनजागृती विषयक विविध उपक्रम राबवावे. अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिल्या
 
				 
 
 
 
 
 




