पिंपरीतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ‘एमआयडीसी’च्या जागा ताब्यात घेणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक त्या रस्त्यांवरील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागा पिंपरी-चिंचवड महापालिका ताब्यात घेणार आहे. महापालिका आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
औद्योगिक आणि नागरी विकासाला गती देण्यासाठी महापालिका आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, प्रादेशिक अधिकारी प्रवीण अडसूळ, कार्यकारी अभियंता संजय कोतवाड बैठकीला उपस्थित होते.
‘महापालिकेच्या वतीने शहरात विविध विकास प्रकल्प राबविले जातात. यातील काही प्रकल्पांसाठी आवश्यक जागा एमआयडीसीकडून महापालिकेला दिली जाते. मात्र, जागा हस्तांतरणास विलंब होतो. याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच शहरातील काही भागांत रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी महापालिका एमआयडीसीकडून पाणी घेते. त्या पाण्याचा दर आणि पाणीपुरवठा वाढीबाबतदेखील बैठकीत चर्चा करण्यात आली.
हेही वाचा – थकबाकीदारांवर कारवाई सुरूच राहणार, ३१ मार्च पूर्वी कराचा भरणा करून जप्तीची कारवाई टाळा; महापालिकेचे आवाहन
पर्यावरणपूरक औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यासाठी सुधारित कचरा व्यवस्थापन उपायांची अंमलबजावणी करणे, नागरी सुरक्षिततेसाठी एमआयडीसीतील रस्त्यांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, मलशुद्धीकरण प्रकल्पांसाठी एमआयडीसीच्या जागा उपलब्ध करून देणे या विषयांवरही चर्चा झाली.
बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. त्यामुळे बहुतांश प्रलंबित विषय मार्गी लागणार आहेत, असे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. महापालिका आणि एमआयडीसीशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रस्ताव तयार केले जातील. आवश्यकता असल्यास सामंजस्य करार करण्यात येतील, असे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांनी सांगितले.