कर्वे रस्त्यावर तरुणीच्या भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

पुणे | पुण्यातील कर्वे रस्त्यावर तरुणी चालवत असलेल्या भरधाव दुचाकीच्या धडकेत एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. 13 डिसेंबरच्या रात्री आठ वाजता सह्याद्री हॉस्पिटल जवळील बसस्टॉपजवळ हा अपघात झाला. मंगल अनिल मुरकुटे (वय 63) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे.याप्रकरणी अनिल मुरकुटे (वय 55) यांनी तक्रार दिली असून डेक्कन पोलीस ठाण्यात निशा संजय जोशी (वय 24) या तरुण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 डिसेंबरच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मयत मंगला मुरकुटे या पायी जात होत्या. त्यावेळी निशा जोशी यांनी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवलेली दुचाकी मंगल यांना जाऊन धडकली. यामध्ये त्या जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.




