‘माझा भाजपात प्रवेश फडणवीस, गिरीश महाजनांनी रोखला’; एकनाथ खडसे

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसेंचा भाजपा प्रवेश काही होताना दिसत नव्हता. यावरून बरेच दावे-प्रतिदावे झाल्यानंतर अखेर एकनाथ खडसेंनी स्वत:च भाजपाप्रवेश होण्याची शक्यता मावळल्याचे सूतोवाच दिले.
एकनाथ खडसे म्हणाले, मी भाजपात प्रवेश केलेला नाही. मी आजही शरद पवार गटात आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. पण पक्षाध्यक्षांनी तो स्वीकारलेला नाही. मी स्वत:हून भाजपात मला प्रवेश द्यावा अशी विनंती कधीही केली नव्हती. भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मला सूचना केली होती की तुम्ही भाजपामध्ये या. मी त्यांना सांगितलं की मी विचार करेन. म्हणून भाजपात जाण्याचा विषय आला.
भाजपात प्रवेश करावा अशी विनंती मला वरीष्ठांकडून आली. मी म्हणालो थोडा वेळ द्या. त्यांनी मला सांगितलं, वेळ कशाला, आत्ताच प्रवेश करा. मी दिल्लीत होतो. विनोद तावडे, रक्षा खडसेंसह मी नड्डांना भेटलो. त्यावेळी त्यांनी माझ्या गळ्यात मफलर घालून सांगितलं की तुमचा प्रवेश झाला. पण त्या प्रवेशाला राज्यातील काही नेत्यांकडून विरोध झाला. त्यामुळे माझा भाजपाप्रवेश थांबला, असं एकनाथ खडसे म्हणाले.
हेही वाचा – दहावं आणि तेराव्याच्या कार्यक्रमांना अनेक कावळे फिरतात; शिंदे गटातील आमदाराची शरद पवारांवर टीका
लोकसभेची निवडणूक होती. त्यात भाजपाचे ९ खासदार निवडून आले. तेव्हा भाजपाची स्थिती नाजूक असल्याचं सर्वेमध्ये दिसत होतं. भाजपाला बळकटी मिळावी या हेतूने वरीष्ठांनी मला भाजपा प्रवेशाची विनंती केली असावी. रक्षा खडसे निवडणुकीत उभ्या राहिल्या तेव्हा त्यांना मदत करण्याचं आवाहन भाजपातून मला करण्यात आलं होतं. मी त्यांना मदत केली, त्या निवडून आल्या. तोपर्यंत मी चांगला होतो. पण निवडून आल्यानंतर मात्र प्रवेशाला विरोध झाला, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
भाजपातले काही लोक आम्ही यांना साथ देणार नाही, आमचं केडर बंद होईल वगैरे सांगू लागले. ज्या माणसाने ४० वर्षं भाजपा उभी केली, हे आत्ता बोलणारे माझ्या नेतृत्वाखाली काम करत होते. या सगळ्यांना राजकीय जीवनात मी बळ दिलं आहे. पण आज तेच काही कारणाने विरोध करत आहेत. हरकत नाही, मीही काही भाजपात जाण्यासाठी फारसा उत्सुक नव्हतो. यासंदर्भात गिरीश महाजन किंवा देवेंद्र फडणवीसांकडून विरोध होऊ शकतो. गिरीश महाजनांनी यावर वारंवार प्रतिक्रिया दिल्या आहेत. मला संभ्रम आहे की राज्यातले नेते मोठे आहेत की नड्डा मोठे आहेत, असंही एकनाथ खडसे म्हणाले.





