पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात , ‘द एलिशियन फिल्ड’, ‘बाप्या’ सर्वोत्कृष्ट

पुणे : गेल्या आठ दिवसांपासून जगभरातील चित्रपटांची पर्वणी दिलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) ‘द एलिशियन फिल्ड’ हा भारतीय चित्रपट प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा मानकरी ठरला, तर संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार ‘बाप्या’ या चित्रपटाने पटकावला.
पुणे फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्यातर्फे आयोजित २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (पिफ) समारोप गुरुवारी बालगंधर्व रंगमंदिरात झाला. या वेळी महाराष्ट्र चित्रपट आणि सांस्कृतिक रंगभूमी विकास प्राधिकरणाचे सह-व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर आणि आंतरराष्ट्रीय परीक्षकांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
याच कार्यक्रमात भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते बिस्वजित चॅटर्जी, ज्येष्ठ अभिनेत्री फरिदा जलाल आणि आशा काळे यांना ‘पिफ डिस्टिंग्वीश ॲवाॅर्ड’, तर ज्येष्ठ व्हायोलिनवादक अमर हलदीपूर यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ‘संगीतकार एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. तर, टाटा मोटर्सचे व्यवस्थापक आनंद आगाशे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुंबई चित्रनगरीच्या दिनदर्शिका आणि डायरीचे प्रकाशन करण्यात आले.
हेही वाचा –‘दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३० लाख कोटींचे सामंजस्य करार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ, महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, मोहन आगाशे, सतीश आळेकर, समर नखाते, अभिजित रणदिवे, ‘पिफ’चे उपसंचालक विशाल शिंदे, आदिती अक्कलकोटकर आदी उपस्थित होते. चित्रपट निवड समितीमध्ये बी. जयमोहन, पिटर केरेकेस, रिट्टा आल्टो, सिनू रामासामी, सेर्गी कासामीतजाना, येसिम उस्ताओग्लू यांचा समावेश होता.
‘चित्रपट आणि रंगभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मराठी चित्रपटांसाठी ‘चित्रपताका’सारखा महोत्सव, विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम सिनेमा पहायला मिळावेत, त्यांना जगभरातील चित्रपटांची माहिती मिळावी यासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे असे उपक्रम राबविण्यात येतात. चित्रपट निर्मितीसाठी आणि चित्रपटांना पाठिंबा देण्यासाठी शासनाने खूप योजना आणल्या असून, राज्यातील तरुणांनी त्यांचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन साजणीकर यांनी केले.
आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
– प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : द एलिशियन फिल्ड, दिग्दर्शक-प्रदीप कुरबाह
– प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार : लॉरा वँडेल, (ॲडम्स सेक)
– ज्यूरी स्पेशल मेन्शन : लॉस्ट लँड, दिग्दर्शक-अकिओ फुजीमोटो
मराठी चित्रपट पुरस्कार
– संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट : बाप्या, दिग्दर्शक-समीर तिवारी
– सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक : संतोष डावखर, (गोंधळ)
– सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता : गिरीश कुलकर्णी, (बाप्या)
– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : राजश्री देशपांडे, (बाप्या)




