खंडाळ्यातील कुणे पुलाजवळ एसटी डंपरच्या अपघातात चालक ठार; नऊ जखमी
अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

लोणावळा | मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस पुढे जाणाऱ्या एका कंटेनरला मागून जोरात धडकून झालेल्या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील नऊजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. बसमध्ये ३३ प्रवासी होते. अपघात गुरुवारी (१० जुलै ) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाटातील कुणे पुलाजवळील वळण व उतारावर झाला. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
इर्शाद अब्दुल मजीद शेख (वय-३८, रा. आष्टी, बीड) असे अपघातात मृत्यू झालेल्या एसटी बस चालकाचे नाव आहे. तर जखमींमध्ये बसचा वाहक सागर दत्तात्रय गुंड (रा.आष्टी, बीड), आप्पा दादाराम ओळकुंटे (वय-६७, रा. माळेगाव, बारामती, पुणे), प्रियंका अंकुश खरात (वय-२६), मिना अंकुश खरात (वय-५२, दोघेही रा. भिवंडी, ठाणे), ऋतुजा बापू हुबाळे (वय-१६, रा. कुर्ला, मुंबई), अनिल ज्ञानोबा कुटे (वय-५९), अक्षय अनिल कुटे (वय-३१, दोघेही रा. कासारवाडी, पुणे), प्रणय दिनेश चव्हाण (वय-२५), महेश मनोज शिंदे (वय-२८, दोघेही रा. सांताक्रूझ, मुंबई) यांचा समावेश आहे.
हेही वाचा : ‘मोदी ७५ वर्षांचे होतायंत म्हणून निवृत्तीचे संकेत’; संजय राऊतांचं विधान
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या (क्रमांक-एमएच-१४/केक्यू-४९५६) चालकाचे खंडाळा घाटातील कुणे पुला जवळील वळणावरील उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि गाडी पुढे जाणाऱ्या कंटेनरला (क्रमांक-आरजे-२९/जीए-९९९४) मागून जोरात धडकून अपघात झाला. या घटनेत एसटी बसच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर बसच्या वाहकासह नऊ प्रवासी जखमी झाले असून, तिघेजण गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक रविंद्र मुदळ व लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीआयचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पहाणी करत अपघातात जखमी झालेल्यांना तत्काळ बाहेर काढून उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटलमध्ये रवाना केले. तर बसच्या केबीनमध्ये अडकलेल्या बसच्या चालकाला देवदूत आपत्कालीन पथकाने मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.





