रोजगार हमी योजनेतील महिलांच्या मुलांसाठी काळजीवाहू नियुक्तीची मागणी; उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार

वाघोली : महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या काळजीसाठी प्रत्येक कामाच्या ठिकाणी एका महिलेची काळजीवाहू म्हणून नियुक्ती करावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. वाघोली येथे किडीलँड्स प्रीस्कूलच्या उद्घाटनप्रसंगी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्याकडे ही मागणी त्यांनी मांडली. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कामगार महिलांना दिलासा मिळेल आणि त्यांचा आशीर्वाद मिळेल, अशी भावनाही गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
वाघोली येथे किडीलँड्स प्रीस्कूलचे उद्घाटन उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे आयोजन शिरूर लोकसभा महिला संपर्कप्रमुख सारिका पवार यांनी केले होते. शिवसेना पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे, माजी आणि विद्यमान शिवसैनिक, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोऱ्हे आणि गोगावले यांनी शाळेच्या संस्थापिका सारिका पवार यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान नीलम गोऱ्हे यांनी वाघोलीशी असलेले आपले भावनिक नाते उलगडले. त्या म्हणाल्या, “वाघेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मला अत्यंत प्रसन्न वाटले. माझे वडील दिवाकर गोऱ्हे यांनी याच वाघोलीत काम केले होते, ही त्यांची कर्मभूमी आहे.” त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत ग्रामपंचायतीच्या बागेत मुलांसाठी झोके, सी-सॉ, बाकडी यांसारख्या खेळण्यांसह महिलांसाठी चालणे आणि खेळण्याच्या सुविधांसाठी आमदार निधीतून 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली.
रोजगार हमी योजनेंतर्गत मराठवाडा, नाशिक, जळगाव, तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, शिरूर आणि आंबेगाव तालुक्यांत मोठ्या प्रमाणात कामे सुरू असतात. या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना आपल्या लहान मुलांची काळजी घेण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने अडचणी येतात. गोऱ्हे यांनी यावर उपाय म्हणून प्रत्येक कामाच्या ठिकाणी एका महिलेची काळजीवाहू म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, “या निर्णयामुळे महिलांना आपल्या मुलांची चिंता न करता काम करता येईल आणि त्यांचे सक्षमीकरण होईल.”
हेही वाचा – पहलगाम हल्ल्यावर शाहिद आफ्रिदीचे वादग्रस्त वक्तव्य: ओवैसी म्हणाले, “त्या जोकरचे नाव घेऊ नका”
गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत भरत गोगावले यांनाही शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, “वाघेश्वराने तुमच्या अनेक इच्छा पूर्ण केल्या आहेत, पण तुमची एक इच्छा लवकर पूर्ण होवो!” या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. गोगावले यांनीही या मागणीवर सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लहान मुले उपस्थित होती. त्यांच्याशी संवाद साधताना नीलम गोऱ्हे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या, “मी मराठी शाळेत शिकले. आमच्या बाई आम्हाला ‘किती किती’ म्हणायच्या, आणि आम्ही ‘छान छान’ म्हणायचो.” या गमतीशीर आठवणीने मुलांशी त्यांनी आपुलकीचा संवाद साधला, ज्यामुळे वातावरण आणखी प्रसन्न झाले.
कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, सहसंपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, जिल्हाप्रमुख सीमा कल्याणकर, तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे, विपुल शितोळे, जिल्हा प्रमुख मनीषा परांडे, पंढरपूर जिल्हा प्रमुख आरती बसवंती यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, किडीलँड्स प्रीस्कूलच्या उद्घाटनाने वाघोली परिसरातील लहान मुलांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळाली आहे. यासोबतच नीलम गोऱ्हे यांनी मांडलेली रोजगार हमी योजनेतील महिलांच्या मुलांच्या काळजीवाहू नियुक्तीची मागणी राज्यभरातील कामगार महिलांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. हा उपक्रम यशस्वी झाल्यास ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागेल.