Corona Virus: ‘मेड इन चायना’ला जबरदस्त फटका; भारताला फायदाच फायदा

पुणे | महाईन्यूज
कोरोना विषाणू जगासाठी चिंतेचाच विषय झाला आहे; मात्र होळीचे साहित्य विकणाऱ्या भारतीय विक्रेत्यांसाठी कोरोना विषाणू लाभदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे चीनमधून भारतीय बाजारपेठेत येणारी उत्पादने मागील तीन महिन्यांपासून येणे बंद झाली आहेत. त्यामुळे होळीच्या बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची मागणी वाढली आहे, अशी माहिती शहरातील विक्रेत्यांनी दिली आहे. दर वर्षी चीनमधून पिचकारी, ढोल, रंग, टोपी, पुंगी आदी साहित्य मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारपेठेत येत असते; परंतु या वेळी कोरोनामुळे ती आली नाहीत. शहरातील विक्रेत्यांनी मिरज, कोल्हापूर, मुंबई, दिल्ली, सुरत, उल्हासनगर या ठिकाणांहून उत्पादने विक्रीसाठी मागवलेली आहेत.
भारतातील बहुतांश सणांमध्ये चीनहून येणाºया उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. कोरोनाबरोबरच, केंद्र सरकारने मेक इन इंडिया, चीनमधून येणाºया उत्पादनांवर लावलेला कर यामुळे सुद्धा चिनी उत्पादने भारतीय बाजारपेठेत कमी झाली आहेत असे विक्रेत्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाचा परिणाम हा येणाºया सणांवर देखील मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. अनेक वर्षांपासून सणासुदीला चिनी उत्पादनांची मागणी अधिक असल्यामुळे विक्रेते भारतीय उत्पादने कमी प्रमाणात विक्रीसाठी ठेवत असत. परंतु आता स्थितीत बदल झाला असून भारतातील उत्पादने थोडी-फार महाग असली, तरी ती खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याने आगामी काळात भारतीय उत्पादनांना चांगले दिवस येतील, असे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे.





