
चाकण : शिक्रापूर रस्त्यावर 16 जानेवारी रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातातील जखमी मुलीचा गुरुवारी (२३ जानेवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाला. धनश्री अंबादास गाढवे (७, रासे, खेड) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्री ही आपल्या आई आणि आईच्या मैत्रिणी सोबत १६ जानेवारी रोजी दुचाकीवरून चालली होती. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने (एचआर 55/एव्ही 2283) या कंटेनरने धनश्रीची आई चालवत असलेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्या तिघीही जखमी झाल्या. धनश्री हिच्यावर पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी उपचारादरम्यान धनश्री हिचा मृत्यू झाला.
हेही वाचा : सुजाण नागरिक होण्याकरता भूगोलाची जाण आवश्यक; डॉ. विजय खरे
भरधाव वेगातील या कंटेनरने पोलिसांच्या गाडीसह अनेक वाहनांना धडक दिली. याप्रकरणी कंटेनर चालकावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि अपघात करणे असे दोन गुन्हे चाकण पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तर शिक्रापूर पोलीस ठाण्यातही अपघाताचा गुन्हा दाखल आहे. एका डंपरला धडक दिल्यानंतर कंटेनर बंद पडला. त्यावेळी तिथे असलेल्या नागरिकांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालकावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्याला डिस्चार्ज दिल्यानंतर चाकण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अपघातात जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू झाल्याने अपघाताच्या गुन्ह्यात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची कलमवाढ केली जाणार आहे.