शहरातील काही भागातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद
‘या’ जलकेंद्र परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार
पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गुरूवारी शहरातील काही भागातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी कमी दाबाने आणि उशिरा पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच मंगळवारी आणि बुधवारी योग्य प्रमाणात पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. गुरूवारी कोणत्या कारणामुळे आणि कोणत्या भागातील पाणी पुरवठा बंद असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
‘या’ जलकेंद्र परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार
पालिकेच्या पाणिपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र, जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती टाकी परिसर, पर्वती टाकी परिसर व पर्वती टाकी परिसर, पर्वती टैंकर पॉईट, बडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीवगांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत टाकी परिसर, शिवणे इंडस्ट्रीज परिसर, एम.एन.डी.टी. एच.एल.आर, एस.एन.डी.टी. एम. एल. आर टाकी परिसर, चतुश्रुंगी टाकी परिसर, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. 1 व 2, गणपती माथा, जुने वारजे जलकेंद्र व नव्याने समाविष्ट गावे बुस्टर पंपिंग अंतर्गत येणाऱ्या परिसरातील विद्युत पंपींग विषयक व वितरण विषयक देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या जलकेंद्राअंतर्गत येणाऱ्या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
हेही वाचा – लाडकी बहीण ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; अद्यापही एक कोटींवर महिलांचे ईकेवायसी नाही…
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत 3000 MM व्यासाची रों वॉटर पाईप लाईन टाकण्यात आलेली आहे. आता खडकवासला धरणातून दोन 1400 MM व्यासाच्या पाईप लाईन 3000 MM व्यासाच्या पाईप लाईनला जोडण्यात आल्या आहेत. तसेच आता या 300 MM व्यासाच्या लाईनवर फ्लो मीटर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच 1400 MM लाईनवरील बटरफ्लाय वॉल्व्ह बसवला जाणार आहे. त्यामुळे 1400 मीमी व्यासाचे स्लुईस वॉल्व्ह पूर्ण बंद होत आहेत. त्यामुळे गुरुवारी धरणातून होणारा पाणीपुरवठा सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
या कारणामुळे शहरातील विविध भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच गुरूवारी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.




