पंचवटी टेकडीवर महाराष्ट्र पक्षी सप्ताहानिमित्त पक्षी निरीक्षण
महाराष्ट्र पक्षी सप्ताहानिमित्त अलाईव्ह ट्रस्टची खास सहल

पुणे : महाराष्ट्र पक्षी सप्ताह साजरा करण्याच्या निमित्ताने अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुणेकरांसाठी एक खास मार्गदर्शित पक्षी निरीक्षण सहल आयोजित करण्यात आली आहे. ही सहल रविवार, ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत पाषाण येथील पंचवटी टेकडीवर होणार आहे. राज्यभर साजरा होणारा महाराष्ट्र पक्षी सप्ताह हा ‘बर्डमन ऑफ इंडिया’ डॉ. सलीम अली आणि मराठी लेखक-पक्षीकोशकार मारुती चितमपल्ली यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो. या उपक्रमाचा उद्देश शहरातील हरित क्षेत्रांतील पक्षी जैवविविधतेबद्दल जागरूकता वाढवणे आणि नागरिक विज्ञान तसेच संवर्धनाला प्रोत्साहन देणे हा आहे.
या सत्राचे मार्गदर्शन सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि प्रशिक्षित पक्षी अभ्यासक उमेश वाघेला करणार आहेत. ते म्हणाले, “पंचवटी टेकडी हे पुण्याचे महत्त्वाचे हरित फुफ्फुस आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांना अधिवास उपलब्ध आहेत. ही मोहीम विद्यार्थ्यांसाठी आणि कुटुंबांसाठी निसर्गाशी जोडले जाण्याची आणि विविध प्रजाती ओळखण्याची उत्तम संधी ठरेल.”
या उपक्रमात दोन तासांचे तज्ज्ञ मार्गदर्शन, पक्षी ओळखण्याच्या तंत्रांचा सराव आणि विविध अधिवासांची पर्यावरणीय भूमिका समजून घेण्याची संधी मिळणार आहे. सर्व वयोगटातील निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि परिवारांसाठी हा उपक्रम खुला असून जागा मर्यादित आहेत. इच्छुकांनी नोंदणीसाठी [https://shorturl.at/ZCfyW](https://shorturl.at/ZCfyW) या लिंकवर आपली नोंदणी करावी.
हेही वाचा – महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा मोठा विस्तार; उपचार मर्यादा थेट 10 लाखांवर
अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टने सांगितले की, वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील जैवविविधता आणि हरित क्षेत्रांचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र पक्षी सप्ताह साजरा करणे हे डॉ. सलीम अली आणि मारुती चितमपल्ली यांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच त्यांच्या वारशाला उजाळा देईल.
अलाईव्ह ट्रस्ट ही निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत ना-नफा संस्था असून जनजागृती, शिक्षण आणि बचाव कार्यावर तिचा भर आहे. मानव आणि वन्यजीव सहजीवन मजबूत करण्यासाठी ट्रस्ट सक्रियपणे काम करते. अधिक माहितीसाठी संपर्क: चैतन्य राजर्षी (सचिव) – ९९२२५०७३३० आणि उमेश वाघेला (अध्यक्ष) – ९८८११०१५४१ यांच्याशी सपंर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.




