लोणावळ्यात सशस्त्र दरोड्यानंतर दुसऱ्याच दिवशी जबरी घरफोडी
लोणावळा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

लोणावळ्यात सर्वपक्षीय बंदची हाक
लोणावळा : लोणावळ्यात सशस्त्र दरोड्याच्या घटनेनंतर पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी लोणावळा शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या शंभर ते दीडशे मीटर अंतरावर घरफोडीची घटना आहे. चोरीची घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली असून, दोन्ही चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहे. हि घटना बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. मंगळवारी मध्यरात्री डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगल्यावर पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेनंतर दुसऱ्याच हि घटना घडल्याने लोणावळ्यात खळबळ उडाली आहे.
लोणावळा शहर व परिसरात सातत्याने होणाऱ्या चोरीच्या घटना व इतर अवैध धंदाच्या घटनांमुळे लोणावळा शहर सर्व पक्षीयांनी नेत्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले आहे. आठ दिवसांत दरोडेखोरांना न पकडल्यास लोणावळा शहर बंदचा इशारा दिला आहे.
बुधवारी पहाटे चारच्या सुमारास लोणावळा शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या शंभर ते दीडशे मीटर अंतरावर पैठणी हाऊस या पैठणी साड्यांच्या दुकानाचे शटर उचकटून दोन पैकी एका चोराने दुकानात प्रवेश करत दुकानातील टेबलाच्या लॉकरला उचकटून त्यातील २५ हजारांची रोकड व एका पाकीटात ठेवण्यात आलेले अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र असा जवळपास अडीच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. हि चोरी संपूर्ण घटना या दुकानातील व दुकाना बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, दोन्ही चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणी पैठणी हाऊसच्या मालकीन द्वारका सुनील ठोंबरे (वय-३६, रा. डोंगरगाव, मावळ) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
लोणावळा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या काही अंतरावर असलेल्या लोणावळ्यातील प्रसिद्ध डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगल्यात मंगळवारी पडलेल्या सशस्त्र दरोड्याने लोणावळा शहर व परिसरात खळबळ उडाली होती. मंगळवारी मध्यरात्री २० ते २२ सशस्त्र दरोडेखोरांनी कुकरी, तलवारी यांसारख्या घातक हत्यारांची बंगल्यात प्रवेश करत डॉ. खंडेलवालसह चौघांना मारहाण करत जवळपास ११ लाख ५० हजारांचा ऐवज लंपास केला आहे. डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्यावर चार वर्षांत चौथ्यांदा दरोडा पडला असुन, यापैकी दोनदा दरोडेखोरांना दरोडा टाकण्यात मोठे यश आले आहे.
हेही वाचा – …मी पहाटेचा शपथविधी आणि ७२ तासांचे मुख्यमंत्रीपद विसरू शकत नाही, देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले?
मंगळवारी रात्री पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये चोर पोलिसांचा खेळ सुरू असल्याचे येथील सीसीटीव्हीत स्पष्ट झाले आहे. पोलिस व त्यांच्या गाडीसमोरच दरोडेखोरांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने पोलिसांच्या तत्परता आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगल्यावर १७ जून २०२१ ला अशाच प्रकारे ११ ते १२ सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत त्यावेळी अधिकृत ६७ लाखांचा ऐवज लंपास केला होता. यामध्ये ५० लाखांची रोकड व १७ लाखांचे विविध प्रकारचे दागिने चोरले होते. तर दोनदा दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न फसला होता.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
दरोडा पडत असताना डॉक्टर खंडेलवाल यांचे पुतणे यांनी लोणावळा शहर पोलिसांना दरोड्या बाबतची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोलीस वाहनांमधून आले होते. त्याचवेळी त्यांच्यासमोरच सर्व दरोडेखोर जात असल्याचे सीसीटीव्हीतील दश्यामध्ये स्पष्ट दिसत आहे. असे असताना देखील पोलिसांनी त्यांना पकडले नाही. सदरची घटनाही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानंतर त्या घटनेवरून लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी लोणावळा शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला आहे. समोर दरोडेखोर असताना देखील पोलिसांनी त्यांना का पकडले नाही, असा प्रश्न उपस्थित करत दरोडा पडला त्यावेळी ड्युटीवर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी या सर्वांचे निलंबन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले आहेत.
सर्व पक्षीयांच्यावतीने लोणावळा बंदचा इशारा
डॉक्टर खंडेलवाल यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांना या दरोडाच्या घटने मधून झालेला मानसिक त्रास व बसलेला धक्का यामधून बाहेर काढत त्यांच्या पाठीशी समस्त लोणावळाकर नागरिक आहेत.,हे आश्वासित करण्यासाठी बुधवारी सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली. पुढील आठ दिवसांमध्ये या दरोड्यांमधील आरोपींना अटक करत चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला नाही तर समस्त लोणावळेकरांच्या वतीने लोणावळा बंद ठेवत पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात येईल असा इशारा सर्व पक्षीय नेत्यांनी दिला. तसेच दरोडेखोर समोर असताना देखील त्यांना न पकडता बघायची भूमिका घेणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांच्या निलंबनाची देखील मागणी या शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे.