शहरातील सर्व पुलांचे होणार सर्वेक्षण

पुणे : नदी, नाल्यांना पूर आल्याने पूल वाहून जाण्याच्या दूर्घटना घडतात. पावसाळ्यातील अशा घटनांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेस पावसाळ्यापूर्वी सर्व पुलांची सुरक्षा तपासणी (सेफ्टी आॅडीट) करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, महापालिकेकडून शहरातील लहान मोठ्या अशा तब्बल ६७२ पुलांची सुरक्षा तपासणी केली जाणार आहे. महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रीया करण्यात आली आहे.
शहरात ७० मोठे पूल, १४ उड्डाणपूल, १८ रेल्वे पूल, ३३ भुयारी मार्ग, ३३ पादचारी पूल व भुयारी मार्ग, छोटे १०८ पूल तर नाल्यांवर तब्बल ४३४ पूल आहेत. शहरातील वाहतुकीसाठी महापालिकेने वेळोवेळी यातील अनेक पूल बांंधले आहेत. त्यातील केवळ नदीवरील पुलांचीच नियमित देखभाल दुरूस्ती केली जात असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : देहूत वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू
शहराच्या मध्यवर्ती भागातून मुठा आणि मुळा नदी वाहते. त्यामुळे नदीकाठच्या दोन्ही भागांना जोडण्यासाठी ब्रिटीशकाळापासून पूल बांधण्यात आले आहेत. या शिवाय, सात प्रमुख मोठे नाला बेसीन असून शहराच्या वेगवेगळ्या भागातून ते वाहतात. त्यामुळे, महापालिकेने वर्दळीचा मार्ग सोपा होण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नाल्यांवर ४३४ पूल बांधण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे, आता प्रशासनाकडून त्यांचीही सुरक्षा तपासणी केली जाणार असून या अहवालानंतर या पुलांच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातही प्रशासनाकडून सुमारे २० कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.