बोपदेव घाट प्रकरणानंतर टेकड्यांची सुरक्षा ‘बळकट’, राज्य सरकारकडून ८० कोटींचा निधी मंजूर

पुणे : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील शहरातील टेकड्यांवर सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारकडून पुणे पोलिसांना ८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेकड्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने निधी मंजूर करण्याची घोषणा केली. त्यानंतर या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, येत्या सहा महिन्यांत शहरातील २२ टेकड्यांवरील सुरक्षाविषयक कामे पूर्ण केली जाणार आहे.
पहिल्या टप्यात शहरातील १२ टेकड्यांवर सुरक्षाविषयक कामे करण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांत सुरक्षाविषक कामे पूर्ण केली जाणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर शहरातील टेकड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. टेकड्यांवरील लूटमार, गंभीर गुन्हे रोखण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना गरजेच्या असल्याने तत्कालिन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमात पोलिसांना आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील टेकड्यांची पाहणी केली होती.
हेही वाचा – अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त वाहतूक बदल; बाणेर, बालेवाडी भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने
टेकड्यांवर पॅनिक बटण यंत्रणा बसविण्यात येणार आहे. पॅनिक बटण दाबताच पोलीस नियंत्रण कक्षाला त्वरित सूचना मिळणार आहे. याशिवाय, टेकड्यांवर १७७ प्रखर प्रकाशझोत (फ्लड लाईट्स) बसविण्यात येणार आहे. पॅनिक बटण दाबताच त्याची सूचना गस्त घालणाऱ्या पोलिसांना मिळणार आहे. त्यानंतर या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रिकरण त्वरित नियंत्रण कक्षास उपलब्ध होईल. टेकड्यांवर ध्वनिवर्धक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. गस्त घालणारे पोलीस कर्मचारी ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करून नागरिकांना सूचना देणार आहेत.
-टेकड्यांवर सुरक्षाविषयक उपाययोजनेसाठी ६०० अत्याधुनिक कॅमेरे
-गस्तीसाठी पोलिसांना वाहने, ड्रोन कॅमेरे
-पोलिसांकडे ध्वनिवर्धक यंत्रणा (पीए सिस्टीम)
-पॅनिक बटण दाबताच नियंत्रण कक्षाला सूचना
-पॅनिक बटणचा वापर केल्यास त्वरित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण नियंत्रण कक्षात
-संपर्क यंत्रणा (रेंज) क्षीण असलेल्या भागात ‘ रेडिओ फ्रिक्वेन्सी’ यंत्रणा