Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचे पाऊल

पुणे : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी शालेय वाहतूक धोरणांतर्गत विशेष प्रकल्प सुरू केला असून, त्या अंतर्गत शाळा परिसरात रस्त्यांवर चिन्हांकित आकृती काढण्यात येत आहे. त्यामुळे वाहनचालक या भागात आले, की त्यांना वाहन सावकाश चालविण्याची सूचना ठळकपणे मिळेल.

महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रितपणे लक्ष्मी रस्ता आणि हुजूरपागा शाळेजवळ पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांची नक्षी काढली आहे. वाहनचालकांकडूनदेखील या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत असून, शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना बिनदिक्कत रस्ता ओलांडता येणे शक्य होत आहे.

हेही वाचा –  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील शाळा या महत्त्वाच्या रस्त्यांवर आहेत. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर चौक, केळकर रस्त्यावर प्राथमिक, माध्यमिक शाळा असून, या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कायम असते. अनेक विद्यार्थी पायी किंवा सायकलवर शाळेत जातात. शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाताना किंवा शाळा सुटल्यानंतर अनेकदा वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. अपघाताचीही शक्यता असते. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रित येऊन प्रमुख शाळांबाहेरील रस्त्यांवर ठरावीक दोन रंगांची नक्षी काढून वाहनचालकांना पूर्वसूचना देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शाळेबाहेरील रस्त्यांवर ३० फुटांपर्यंत पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या नक्षीमुळे वाहनचालकांना शाळा असल्याचे लक्षात येईल. शाळा सुटण्यापूर्वीच नाही, तर इतरवेळी देखील शाळेचा परिसर असल्याचे स्पष्ट होऊन वाहनचालकांना वेग कमी करण्याचे संकेत मिळतील. वेग नियंत्रित झाल्याने अपघात किंवा अडचण न राहता सुरक्षितता निश्चित करता येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

शहरातील शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता निश्चित करणे ही पुणे महानगरपालिकेची प्राथमिकता आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रमुख रस्त्यांवर उपक्रम राबविला जाणार आहे. शहरातील वर्दळीची सात ते आठ ठिकाणे यासाठी निश्चित करण्यात आली आहेत.

-अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख, पुणे महानगरपालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button