‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा मंत्री चंद्रकांत पाटील, आदिती तटकरे यांच्याकडून आढावा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ हस्तांतरणाच्या 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा घेतला.
पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्वाची योजना असून श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात या योजनेतील पात्र महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभ देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिला लाभार्थ्यांना सर्वप्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करुन देतानाच त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ हस्तांतरणाच्या 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन घेतला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रसाद लाड, आमदार भिमराव तापकीर, आमदार योगेश टिळेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, वैद्यकीय पथक, वाहतूक व्यवस्था, मोबाईल टॉयलेट, परिसराची स्वच्छता इत्यादी व्यवस्था चोखपणे कराव्यात. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणावर अर्ज करत आहेत. मात्र त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे.
हेही वाचा – मराठा आरक्षण शांतता फेरीनिमित्त शहरातील वाहतुकीत बदल
विधान परिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, प्रशासनाने महिलांना सर्वप्रकारच्या योजनांचे लाभ द्यावे, तसेच पात्र महिला लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्यात एकूण 1 कोटी 42 लाख महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान 3 लाख महिलांनी नोंदणी केली आहे. राज्यात सर्वाधिक नोंदणी पुणे जिल्ह्यात झाली आहे हे लक्षात घेऊन लाभ प्रदानाचा राज्यस्तरीय कार्यक्रम पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात संबधित पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखली लाभ प्रदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्या म्हणाल्या, सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनेचे अर्ज भरून घेण्याची कार्यवाही मोहिमस्तरावर करावी. योजनेचा लाभ हस्तांतर करण्यासाठी महिलांचे बँकखाते आधार क्रमांकासह मोबाईल क्रमांकाशी संलग्न असल्याची खात्री करा. त्यासाठी गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या महत्वाकांक्षी योजनेची ग्रामीण भागात सकारात्मक प्रसिद्धी करावी. नोंदणीसाठी काम करणाऱ्या आशासेविका, ग्रामसेवक, उमेद, माविम, अंगणवाडी सेविका अशा सर्वच घटकांचा कार्यक्रमात समावेश करा अशी सूचना त्यांनी केली. पावसाची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करा, बैठक व्यवस्था, पार्किंग, स्वच्छतागृहाची व्यवस्था आदी व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभ प्रदानाचा राज्यस्तरीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केल्याचे सांगितले. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.