‘जीबीएस’ सर्वेक्षणासाठी ६४ पथके

पुणे : गुलियन बॅरी सिंड्रोमच्या (जीबीएस) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सिंहगड रस्त्यावरील काही भाग, किरकटवाडी आणि समाविष्ट गावांत सर्वेक्षण सुरू केले आहे. यासाठी ६४ पथके नेमण्यात आली आहेत.
नांदेड, धायरी, नऱ्हे, किरकटवाडी, डीएसके विश्व या भागातच रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या भागात रुग्णांचे सर्वेक्षण करण्याला सुरूवात केली आहे. यामध्ये एक आशा कर्मचारी आणि एक नर्स यांचा समावेश आहे. हे दोनजण प्रत्येक घरी जाऊन माहिती घेणार आहेत.
हेही वाचा : भारतपर्व महोत्सवात महाराष्ट्राचा ‘मधाचे गाव’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ
यामध्ये डायरिया, उलट्या किंवा तत्सम रोगाची लागण झालेले रुग्ण, “जीबीएस’सदृष्य लक्षणे या सगळ्या माहितीचा समावेश आहे. या भागांतल मोठ्या टाउनशीपच्या सुरक्षा प्रशासनाने या सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असेही आवाहन महापालिकेने केले आहे. येत्या सात ते आठ दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर येथील सर्वेक्षण अहवाल उपलब्ध होऊ शकेल.
पाण्याचे नमुने तपासणीसाठी
राजाराम पूल ते धायरेश्वर मंदिरापर्यंत सर्व भागांतील पाण्याच्या टाक्या, विहिरी, सोसायट्यांतील पाण्याच्या साठवणुकीच्या टाक्या येथील सुमारे १३ ठिकाणचे नमुने घेण्यात आले आहेत. या माध्यमातून बॅक्टेरियल, व्हायरल आणि केमिकल अशा तीन तपासण्या करण्यात येणार आहेत, अशी माहिती मनपा आरोग्यप्रमुख नीना बोरडे यांनी दिली.