कचरा वाहतुकीसाठी ३२३ कोटींचा खर्च
![323 crores spent on waste transportation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/PMC-waste-money-780x470.jpg)
पुणे : कचरा वाहतुकीसाठी सात वर्षांच्या कालावधीसाठी महापालिका २५७ गाड्या भाडेकराराने घेणार आहे. त्यासाठी ३२३ कोटींचा खर्च अपेक्षित असून या खर्चाला महापालिकेने मान्यता दिली आहे. शहरात दैनंदिन निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याच्या वाहतुकीसाठी सध्या ६९८ गाड्या वापरल्या जात आहेत. त्यापैकी १६१ गाड्यांचे आयुर्मान १५ वर्षांपेक्षा जास्त आहे. आयुर्मान संपल्याने गाड्या नादुरुस्त झाल्याने कचरा वाहतुकीसाठी या गाड्यांचा वापर करणे महापालिकेसाठी काही प्रमाणात अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी गाड्या भाडेकराराने घेण्याचा निर्णय घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला होता. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली होती. या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत या मान्यता देण्यात आली.
शहरात रोज २२०० टन कचरा निर्माण होतो. शहराच्या विविध भागांतील रॅम्प, कचरा प्रकल्पापर्यंत हा कचरा वाहून नेण्यासाठी मोठी घंटागाडी, डंपर, कॉम्पॅक्टर यांसारख्या सुमारे ८५० वाहनांची आवश्यकता महापालिकेला आहे. कचरा वाहतुकीसाठी पालिकेच्या मालकीची ६९८ वाहने असून, १५० वाहने आवश्यकतेनुसार भाडेतत्त्वावर घेतली जात आहेत. रिफ्युज कलेक्टर १९, कॉम्पॅक्टर ११, घंटागाडी २० ही ५० वाहने सात वर्षे भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्यात स्वयंभू ट्रान्स्पोर्टला ६४ कोटी २९ लाख ८३ हजार १३२ रुपयांचे काम देण्यात आले. तर सुमित फॅसिलिटी लिमिटेड ही कंपनी १६ कलेक्टर, १३ कॉम्पॅक्टर, १९ घंटागाडी सात वर्षे भाडेकराराने महापालिकेला देणार आहे. त्यासाठी ६५ कोटी ६२ लाख ३१ हजार २५९ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सात वर्षांसाठी गाड्या भाडेकराराने घेण्यासाठी पाच स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या होत्या. त्या सर्व निविदांना मंजुरी देण्यात आली. महागाई भाववाढ सूत्रानुसार या निविदाधारकांना सात वर्षे अतिरिक्त रक्कम महापालिका देणार आहे.