पुण्याचे जवान संभाजी राळे यांना अरुणाचल प्रदेशात वीरमरण
पुणे – पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कुरकुंडी गावचे जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांना वीरमरण आले आहे. वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी संभाजी राळे शहीद झाले. अरुणाचल प्रदेश येथे तब्येत खालावल्यामुळे त्यांना वीरमरण प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
शहीद संभाजी राळे हे आसामच्या तेजपुर येथे नाईक पदावर कार्यरत होते. 102 इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती होती. राळे यांच्या पश्चात आई-वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. संभाजी राळे यांना वीरमरण आल्याने राळे कुटुंबियांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, देशाचे संरक्षण करणारे भारतीय लष्कराचे जवान सीमेवर शत्रूशी दोन हात करण्यासाठी सदैव सज्ज असतात. देशात नववर्षाचे स्वागत सुरु असताना सीमेवर शत्रूंच्या कुरघोडी सुरूच आहेत. नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यावेळी भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत शत्रूला पळता भूई थोडी केली.





