IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल!
राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल
मुंबई : राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे सातारा, सांगली, गडचिरोली, कोल्हापूर, जळगाव यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनात मोठे बदल होणार आहेत. या बदल्यांमध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदस्थापना बदलण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
IPS Transfers Maharashtra : कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?
या आदेशानुसार तुषार दोशी यांची सातारा येथून सांगली येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर निखिल पिंगळे यांची पुणे येथील पोलीस उपआयुक्त पदावरून सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप घुगे यांना सांगलीवरून मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपआयुक्त (सुरक्षा) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून तुषार दोषी चांगलेच चर्चेत आले होते. शिवसेनेने त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. आता मात्र त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.
योगेश गुप्ता यांना कोल्हापूरवरून गडचिरोली परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक (अतिरिक्त जबाबदारी) म्हणून नेमण्यात आले आहे. तर निलोत्पल यांची गडचिरोलीवरून कोल्हापूर येथे अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. एम. रमेश यांना गडचिरोली येथेच पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नतीसह नियुक्त करण्यात आले आहे.
महेश्वर रेड्डी यांची जळगाववरून पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे. तर श्रीकांत धिवरे यांची धुळेवरून जळगाव येथे अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजकुमार शिंदे यांना पुणे येथून वाशीम येथे पोलीस अधीक्षक म्हणून पाठवण्यात आले आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, पोलीस महासंचालकांनी कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन आवश्यक ती पुढील कार्यवाही करावी. हा आदेश सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने जारी करण्यात आला असून अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आला आहे.





