भ्रष्टाचाराला पायबंद घाला; अन्यथा राष्ट्रवादी युवक रस्त्यावर उतरून आंदोलन करेल
– राष्ट्रवादीचे युवकचे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत चालू असलेल्या भष्ट्राचाराला आळा घाला. अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना निवेदनाद्वारे दिला.
या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेवक राज़ु बनसोडे, विशाल बाळासाहेब काळभोर, करण कोकणे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात नमुद केले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सन २०१७ पासून स्थापत्य, पाणी पुरवठा जलनिस्सारण इत्यादी विभागामार्फत विविध विकास कामांसदर्भात निविदा काढल्या जातात. त्यामध्ये बहुतांश वेळा ठेकेदार व अधिकारी मिळून रिंग करुन ठराविक ठेकेदारांनाच निविदा मिळतील अशा प्रकारे निविदा अटी शर्ती ठेवतात. त्यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्याच प्रमाणे मार्च २०२० पासून शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाला. त्याला प्रतिबंध करण्यासाठी मनपा प्रशासनाने विविध उपाय योजना युध्द स्तरावर चालू केल्या. यामध्ये मास्क सँनिटाझर इत्यादीच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालेला आहे.
त्याच प्रमाणे मनपामार्फत शहरात विविध ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आली होती. त्यांची बिलेही एकही रुग्ण नसताना देण्याचे घाट सुरु आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गांच्या प्रतिबंधासाठी सीएसआर अंतर्गंत विविध खाजगी कंपन्यांनीही मनपास मदत केली. परंतु त्यांनी किती मदत केली, कश्या स्वरुपात केली याचा हिशोब अद्याप लागत नाही. कोविड काळात रुग्ण दाखल नसतानाही स्पर्श हॉस्पिटलने मनपाकडे बिले सादर केली आहेत. हे सर्व संशयास्पद असून त्यांना बिल अदा करु नये अशा प्रमाणे इतर रुग्णालयांनी तसेच खाजगी कोविड सेंटरने जर बिले सादर केली असतील तर ती देऊ नयेत, अशी मागणी या वेळी युवक ने केली .
तसेच यापूर्वी किती आणि कोणत्या खाजगी कोविड सेंटरसा बिले अदा केली आहेत त्या तपशील द्यावा. मागील चार वर्षापासून थेरगाव बापुजीनगर येथील २०० खाटांच्या रुग्णालयाचे काम अद्यापही अर्धवट आहे याची कारणा सविस्तरपणे देण्यात यावी. शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यत कोरोना विषाणू प्रतिबंध करण्यासाठी मनपाने किती रक्कम कश्या प्रकारे खर्च केली याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी. त्याच प्रमाणे सी.एस.आर. मधून खाजगी कंपन्यांनी मनपास किती मदत कश्या प्रकारे केली याचीही सविस्तर माहिती देण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनांद्वारे देण्यात आला.





