breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेराष्ट्रिय

पुणेकरांनो खुषखबर : खडकवासला ते खराडी मेट्रो धावणार !

पुणे । महाईन्यूज ।

शहरात दोन नवीन मेट्रो मार्गाचा प्रारूप प्रकल्प आराखडा महामेट्रोकडून महापालिका प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. खडकवासला ते खराडी आणि एनएसडीटी महाविद्यालय ते माणिकबाग असा 31 किलोमीटरचा नवीन मार्ग असणार आहे. त्याचबरोबर वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या दोन मार्गांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 12 हजार कोटी खर्च अपेक्षित असल्याचे मेट्रोच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

पुणे शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यासाठी निधी देण्यात आला होता. त्यानुसार महामेट्रोने सध्या काम सुरू असलेल्या दोन मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण केले आहे. यामध्ये वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोलीचा समावेश आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमोर मेट्रो मार्गाचे सादरीकरण करण्यात आले. राज्य आणि केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

वनाज ते रामवाडी हा मार्ग वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली असा विस्तारीत केला जाणार आहे. यामध्ये नवीन 13 स्टेशन उभारले जातील. रामवाडी ते वाघोली हा मार्ग 11 किमी असून, येथे 11 स्टेशन उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी 3 हजार 323 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मेट्रो मार्गाच्या दुसर्‍या टप्प्यातील सुमारे 28 किलोमीटर मार्गाचा आराखडा महामेट्रोने तयार केला आहे. या प्रस्तावाचे सादरीकरण मंगळवारी पार पडले.

या आराखड्यासंदर्भात महापालिका प्रशासन अभ्यास करून पुढील सूचना करणार आहे. हा मार्ग खडकवासला-हडपसर-खराडी असा आहे. या मार्गावर 25 हून अधिक स्थानके असतील. या मार्गासाठी सुमारे 8 हजार 585 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

या मार्गात स्वारगेट, सिंहगड रस्ता, सोलापूर रोड येथील अस्तित्वात असलेले उड्डाणपूल पाडले जाणार नाहीत, असा दावा महामेट्रोच्या अधिकार्‍यांनी केला आहे. उड्डाणपुलालगत असलेल्या सर्व्हिस रोडच्या जवळील जागा ताब्यात घेऊन मार्ग उभारणी केली जाणार आहे.

खडकवासला ते खराडी असा असणार मेट्रो मार्ग
खडकवसाला, सिंहगड रस्त्यावरून स्वारगेट, शंकरशेठ रस्त्याने पुढे राम मनोहर लोहिया उद्यान, मुंढवा चौक मार्गे खराडीकडे मेट्रो जाईल. संपूर्ण मार्ग हा उन्नत असणार आहे. स्वारगेट या ठिकाणी निगडी ते कात्रज या मार्गाजवळून मेट्रो जाईल. त्यामुळे गणेश कला क्रीडा मंच याठिकाणी स्टेशन तयार करण्यात येणार असून ते स्वारगेट मेट्रो स्टेशनला जोडण्यात येईल. या मार्गावर एकूण 22 स्थानके असणार आहेत. मेट्रोसाठी जास्तीत जास्त शासकीय जागा घेण्यात येणार आहेत.

मेट्रो स्थानकांची नावे
खडकवासला, दालवेवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम पूल, पु.ल. देशपांडे उद्यान, दांडेकर पूल, स्वारगेट, सेव्हन लव्ह चौक, पुणे छावणी, रेसकोर्स, फातिमानगर, रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा, मगरपट्टा मेन, मगरपट्टा नॉर्थ, हडपसर रेल्वे स्टेशन, साईनाथ नगर, खराडी चौक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button