कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळ्या आईच्या मांडीवर खेळलेले पक्ष – अजित पवार
पुणे | महाईन्यूज
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या दोन पक्षाबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याला आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळ्या आईच्या मांडीवर खेळलेले पक्ष आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अजित पवार यांनी असे स्पष्टीकरण दिले आहे. काही दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकाच आईच्या मांडीवर खेळलेले पक्ष आहेत. भविष्यात या दोघांनी एक होणं आवश्यक आहे, असं म्हणत विलीनीकरणाचे संकेत दिले होते. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हे वक्तव्य खोडून काढलं. सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलेलं मत त्यांचं वैयक्तीक मत आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
“काँग्रेस आणि राष्ट्रवादी भविष्यात एक होण्याची शक्यता आहे. खरंतर शरद पवार आणि माझ्यात फक्त साडेआठ महिन्यांचा फरक आहे. कधीकाळी आम्ही एकाच आईच्या मांडीवर वाढलो आहोत. जे झालं त्याबाबत आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही मनात खंत आहे. पण ते कधी बोलून दाखवत नाहीत. पण वेळ येईल तेव्हा ते नक्की बोलून दाखवतील”, असे वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं.