breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

पुणेकरांसाठी आनंदवार्ता ः पुणे रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट !

  • पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढविणार
  • इंदूराणी दुबे यांनी स्वीकारला पुणे रेल्वेच्या व्यवस्थापकदाचा कार्यभार .

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार असल्याचा निर्धार पुणे रेल्वेच्या नव्या व्यवस्थापक इंदू राणी दुबे यांनी व्यक्त केला. स्थानकातील सर्व फलाटांची लांबी वाढविणे, स्थानकात पादचारी पुलाला जोडण्याच्या लिफ्ट बसविणे, सीसीटीव्ही यंत्रणेच्या जाळ्याच्या विस्तारासह पुणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी विकसित करण्यात येत असलेल्या हडपसर टर्मिनलबाबतही योजनात्मक पद्धतीने काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इंदू राणी दुबे यांनी नुकताच पुणे रेल्वेच्या व्यवस्थापकदाचा कार्यभार स्वीकारला. शुक्रवारी (२ डिसेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे विभागाशी संबंधित विविध योजनांची माहिती दिली. अपर व्यवस्थापक बी. के. सिंह, वरिष्ठ अभियंता पी. के. चतुर्वेदी, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाहतूक व्यवस्थापक डॉ. स्वप्निल नीला, जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर आदी अधिकारी त्या वेळी उपस्थित होते.

दुबे म्हणाल्या, की पुणे स्थानकावरील दोन फलाटावरच सध्या २६ डब्यांच्या गाड्या उभ्या करता येऊ शकतात. पुढील काळात सर्वच फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्याबाबतची योजना तयार असून, लवकरच त्याबाबत काम सुरू करण्यात येणार आहे. स्थानकातील पादचारी उड्डाणपुलाच्या प्रश्नातही लक्ष घालण्यात येणार आहे. पुलाला जोडण्यासाठी स्थानकात पाच लिफ्टला मंजुरी मिळाली आहे. त्या बसविण्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल. रॅम्प सुविधेबाबतही नियोजन करण्यात येणार आहे. स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा जुनी झाली असून, ती बदलून सीसीटीव्हीचे जाळे आणखी सक्षम करण्यात येणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्यावाढ, पुण्याहून अयोद्धेसाठी स्वतंत्र गाडीची सुविधा आदींबाबतही प्रयत्न करणार असल्याचेही दुबे यांनी स्पष्ट केले.

पुणे-लोणावळा लोकल वाढविणार
पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या दुपारच्या फेऱ्या पूर्ववत न झाल्याने या मार्गावर दररोजचा प्रवास करणारे विद्यार्थी आणि नोकरदारांची होणाऱ्या गैरसोयीबाबत इंदू दुबे यांना विचारले असता, प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने दुपारच्या वेळेतील लोकलच्या फेऱ्या पूर्ववत करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. सध्या पुणे-लोणावळा मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यातून लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग प्रतितास ११० वरून १३० किलोमीटर करण्यात येईल. या नियोजनातून उपनगरीय वाहतुकीतील फेऱ्यांची संख्या वाढू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे-दौंड मार्गावर डेमू लोकलऐवजी पुढील काळात मेमू लोकल चालविण्यात येणार असून, डब्यांची संख्याही वाढविली जाईल, असेही या वेळी सांगण्यात आले.

खडकी स्थानकाचाही विस्तार
खडकी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक चारच्या विस्ताराचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या फलाटाच्या विकासासाठी मध्य रेल्वेकडून २९ कोटी रुपयांचा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पुढील सहा ते सात महिन्यांत हे काम पूर्ण होऊ शकणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button