बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समधील 4500 पादत्राणांमागील करुण कहाणी
ब्रुसेल्स (बेल्जियम) – बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समधे 4,500 पादत्राणे मांडलेली आहेत. युरोपियन युनियन काऊन्सिलच्या इमारतीसमोर मांडून ठेवलेल्या या पादत्राणांची कहाणी मोठी करूण आहे. ही 4,500 पादत्राणे आवाज नावाच्या एका संस्थेने मांडून ठेवली आहेत. एका गंभीर समस्येकडे जगाचे लक्ष वेधावे हा या मागचा हेतू आहे.
ज्या 4,500 व्यक्तींची पादत्राणे येथे मांडून ठेवलेली आहेत, त्यांच्यात लहान मुले, तरुण, म्हातारे, महिलांचा समावेश आहे. हे सर्व विविध वयोगटातील असून त्यांच्यापैकी कोणीही आता या जगात नाही. आणि ज्या प्रकारे त्यांना मरण आले, ते ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षात इस्रायली लष्कराकडून मारल्या गेलेल्या पॅलेस्टीनच्या नागरिकांची पादत्राणे आहेत ही. त्यांना न्याय मिळावा अशा अपेक्षेने ही पादत्राणे येथे मांडून ठेवण्यात आलेली आहेत. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात दीर्घकाळ संघर्ष चालू आहे.
आवाज नावाच्या संघटनेने या संबंधात एक विश्वव्यापी आंदोलन सुरू केले आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात जे मारले गेले आहेत, त्यांची पादत्राणे येथे मांडून ठेवायची. ती पाहिल्यानंतर मारल्या गेलेल्या व्यक्तींची मानचित्रे लोकांच्या डोळ्यासमोर उभी राहतील.