ताज्या घडामोडीमुंबई

प्रतिज्ञा मजूर संस्थेत प्रवीण दरेकर ‘रंगारी’; एकही सदस्य मजुरी करीत नसल्याचा अहवाल

मुंबई |  विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ज्या मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मुंबै बँकेची निवडणूक लढविली होती त्या प्रतिज्ञा मजूर संस्थेत ते रंगारी असल्याचे दाखविले आहे. याशिवाय या मजूर संस्थेतील सर्वच सदस्य मजुरी करीत नसल्याचा अहवाल सहकार खात्याच्या ए विभागाच्या उपनिबंधकांनी दिला आहे. सदर संस्थेच्या पत्त्यावर दुसरीच व्यक्ती भाडय़ाने राहत असल्याचे उघड झाले आहे.

प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे मतदार म्हणून दरेकर यांनी मजूर या प्रवर्गातून मुंबै बँकेची निवडणूक लढविली. दरेकर हे मजूर असू शकत नाहीत, अशी तक्रार आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केली होती. याशिवाय या संस्थेच्या दफ्तर तपासणीचे आदेशही ए विभागाचे उपनिबंधक प्रशांत सातपुते यांना दिले.

सातपुते यांनी १५ फेब्रुवारी रोजी विभागीय सहनिबंधकांना सादर केलेल्या अहवालात, या मजूर संस्थेतील सर्वच सदस्य मजुरी करीत नसल्याचे तसेच मजूर असल्याबाबत दाखलाही सादर केला नसल्याचे म्हटले आहे. या संस्थेने २०१६-१७ पासून आतापर्यंत हजेरी पत्रक ठेवले असून त्यावर मजुरी वाटप केल्याचे आढळून येते. याआधीचे हजेरी पत्रक मिळालेले नाही. २००६ मध्ये पावसात संस्थेचे दफ्तर भिजल्यामुळे तर काही दफ्तर वाळवीने नष्ट झाल्याचा दावा संस्थेकडून करण्यात आल्याचा उल्लेख या अहवालात आहे.

२०१६ ते २०१९ या कालावधीत मजुरांना पगाराचे वाटप केल्याचेही त्यात नमूद आहे. मात्र या काळात संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी रोखीने रक्कम काढल्याचे दिसून येते. संस्थेने १५ सदस्यांची खाती मुंबै बँकेत उघडली आहेत. मात्र या खात्यात मजुरी जमा करण्यात आलेली नाही. त्याऐवजी रोखीने मजुरी दिल्याचा दावा केला आहे. संस्थेने मजूर वाटप नोंदवही ठेवलेली नाही. त्यामुळे मागील दहा वर्षांत किती सदस्यांना मजुरी दिली, प्रत्यक्ष मजुराला मजुरी दिली का, हे स्पष्ट होत नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिज्ञा मजूर संस्थेचे अध्यक्ष व सचिवांनी लेटरहेडवर दरेकर हे रंगारी असल्याचे नमूद करताना २०१६ ते २०१९ पर्यंत १४५ दिवस काम करून ६६ हजार रुपयांची मजुरी दिल्याचे म्हटले आहे. परंतु प्रत्यक्षात मजूर नोंदवही उपलब्ध नसल्याचे अहवालात नमूद केले आहे.

एकाच कुटुंबातील चार मजूर..

या अहवालात मजुरी मिळालेल्यांची जी नावे आहेत त्यात मर्गज कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश आहे. शिवाय काही दाम्पत्येही मजूर आहेत. मात्र या सर्वाचे पत्ते उपलब्ध नसल्यामुळे ते खरोखरच मजुरी करतात का, हे तपासता आलेले नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button