ताज्या घडामोडीमुंबई

भिवपुरी प्रकल्पात पाण्याच्या पुनर्वापराचा विचार; मुंबईच्या वीजपुरवठयाची शताब्दी

मुंबई| मुंबईला वीजपुरवठा करत या महानगरीच्या आर्थिक प्रगतीत योगदान देणाऱ्या टाटा पॉवरच्या भिवपुरी येथील ७५ मेगावॉटच्या जलविद्युत प्रकल्पाने नाबाद शतक पूर्ण केले आहे. आता १०० वर्षे झाल्यानंतर भविष्यात या ठिकाणी उदंचन जलविद्युत प्रकल्प राबवून त्याच पाण्यातून पुन्हा वीजनिर्मितीसाठी वापर करता येईल का याची चाचपणी करण्यात येत आहे.

टाटा पॉवरचा भिवपुरी जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात जुन्या वीज प्रकल्पांपैकी एक आहे. खोपोलीतील १९१५ मधील जलविद्युत प्रकल्पानंतर १९१६ मध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळील भिवपुरी येथे वरती घाटमाथ्यावरील ठोकरवाडी धरणाच्या पाण्याचा वापर करून जलविद्युत प्रकल्प राबविण्याची आखणी झाली. तो भिवपुरी जलविद्युत प्रकल्प १९२१-२२ मध्ये सुरू झाला आणि गेली १०० वर्षे मुंबईला खात्रीशीर वीजपुरवठा करत आहे. सुरुवातीला या प्रकल्पाची क्षमता ४८ मेगावॉट होती. १९९७ मध्ये ती ७५ मेगावॉट करण्यात आली. शंभरी पार केलेल्या या जलविद्युत प्रकल्पात आता नवीन योजना राबविण्याचा विचार सुरू झाला आहे. जलविद्युत प्रकल्पातून एकदा वीजनिर्मिती झाल्यावर ते पाणी खाली बंधाऱ्यात साठवायचे. पहाटे वीजमागणी किमान असताना ते पाणी उपसा करून पुन्हा एकदा वरच्या बंधाऱ्यात चढवून वीजमागणी कमाल असताना पुन्हा वीजनिर्मितीसाठी वापरायचे या तत्त्वावर चालणारा उदंचन जलविद्युत प्रकल्प भिवपुरी येथे उभारता येईल का याचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा यांनी दिली.

टाटा पॉवरच्याच भिरा जलविद्युत प्रकल्पस्थळी अशा उदंचन जलविद्युत प्रकल्पाची आखणी सुरू झाली आहे. त्याच धर्तीवर भिवपुरीलाही असा प्रकल्प उभारता येईल का हे तपासून पाहिले जाणार आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली. खोपोली, भिरा व भिवपुरी जलविद्युत प्रकल्पातून सोडले जाणारे पाणी कोकण भागातील उल्हास, पाताळगंगा व कुंडलिका नद्यांना जाऊन मिळते.

या पाण्यामुळे कर्जत, अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे, बदलापूर, मीरा-भायंदर, वसई इत्यादी भागांमध्ये औद्योगिकीकरण, शहरीकरण, सिंचन विकास, व्यापार-उद्योगधंद्याला उपयोग झाला आहे.

ठपका ठेवणे चुकीचे..

मुंबईत नुकताच वीजपुरवठा खंडित झाला त्यावेळी टाटा पॉवरच्या प्रकल्पातून वीजनिर्मिती वाढविण्याची सूचना राज्य भार प्रेषण केंद्राने केली होती. पण टाटा पॉवरने मेल पाठविण्याची मागणी केली. त्यामुळे परिस्थिती चिघळल्याचे ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले होते. त्याबाबत विचारले असता, आमच्यावर ठपका ठेवणे चुकीचे आहे. वीजनिर्मिती वाढवायची तर यंत्रणेमार्फत योग्य रितीने संदेश आला पाहिजे. दूरध्वनीवरील सूचनेवर कशी अंमलबजावणी करणार असा सवाल प्रवीर सिन्हा यांनी केला. तसेच याबाबत सरकारी यंत्रणेलाही स्पष्टीकरण दिल्याचे सिन्हा यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button