ताज्या घडामोडीमुंबई

एसटी नफ्यात येत नाही, तोवर नोकरभरती बंद; महामंडळाचा निर्णय जाहीर; प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांनाही संधी नाही

मुंबई | तोटय़ात असलेले एसटी महामंडळ, करोना आणि संप कालावधीत झालेले नुकसान यामुळे महामंडळाने खर्च कपातीसाठी केलेल्या नियोजनात नवीन भरतीवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत एसटी नफ्यात येत नाही, तोपर्यंत नवीन भरती होणार नाही, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. विलीनीकरणासंदर्भात नुकत्याच सादर झालेल्या तीन सदस्य समिती अहवालातही महामंडळात नवीन भरतीवर निर्बंध आणण्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे प्रतीक्षा यादीवरील २,२०० कर्मचाऱ्यांचेही दरवाजे बंद झाले आहेत.

एसटी महामंडळाला २०२०-२१ मध्ये ४ हजार १३८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. तर खर्च ५ हजार ८६६ कोटी रुपये होता. तर संचित तोटा ७ हजार ९९ कोटी रुपये झाला. २०२१-२२ मध्ये ६ हजार ८९० उत्पन्न असून १० हजार १९८ खर्च झाला आहे. त्यामुळे संचित तोटय़ातही तेवढय़ाच प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या सहा ते सात वर्षांत संचित तोटय़ात वाढच होत गेली. यामध्ये करोनामुळे उत्पन्नावर परिणाम होतानाच गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या संपामुळे मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागले.

होणारे नुकसान, तोटा यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाला शासनाकडूनच मिळणाऱ्या निधीवरच अवलंबून राहावे लागले. त्याचा परिणाम महामंडळाच्या भरती प्रक्रियेवरही झाला.

यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी, एसटी महामंडळ जोपर्यंत फायद्यात येत नाही, तोपर्यंत नवीन भरती होणार नसल्याचे सांगितले. त्याचा कालावधी किती असेल हे सांगणे कठिण असल्याचे ते म्हणाले. एसटीच्या २,२०० चालक कम वाहकांच्या भरती प्रक्रियेवरही अद्याप स्थगिती असून त्याबद्दलही विचारले असता त्यांचाही विचार करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले. संप मिटला आणि कर्मचारी कामावर परतल्यास प्रतीक्षा यादीवरील कर्मचाऱ्यांना घेतल्यानंतर पुन्हा त्याचा आणखी भार महामंडळावरही येईल. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या भरतीही तुर्तास होणार नसल्याचे सांगितले.

त्रिसदस्यीय समितीची शिफारस

विलीनीकरणाच्या मागणीनंतर नेमलेल्या तीन सदस्य समितीचा अहवाल सादर झाला आहे. या अहवालात महामंडळाने उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना आणि खर्चात कपात करण्यासाठी नियोजन सादर केले आहे. खर्च कपातीमध्ये नवीन बस खरेदी करताना त्या सीएनजी इंधनावर घेणे, भाडेतत्त्वावर नवीन बसचा समावेश करणे यासह महामंडळात नवीन भरतीवर निर्बंध आणण्याचे नियोजन केले आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button