महापालिकेतर्फे धाडसी ‘आयुष’चा गौरव
पिंपरी – सदगुरुनगर, भोसरी येथे राहणाऱ्या आयुष तापकीर या 13 वर्षाच्या मुलाने तलावात बुडणाऱ्या तीन मुलांना पाहिले आणि प्रसंगावधान राखून मोठ्या धाडसाने आणि शौर्याने त्यांना पाण्याबाहेर काढले. त्यामुळे त्यातील दोघांचा जीव वाचला. या त्याच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्याचा महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जैव विविधता व व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे, नगरसेवक संतोष लोंढे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, आयुषचे वडील गणेश तसेच त्याची आई व नातेवाईक उपस्थित होते.
आयुषच्या या कामगिरीची दखल घेऊन त्याची बाल शौर्य पुरस्कारासाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करण्यात येणार आहे. आयुष तापकीर याने वयाच्या 3 वर्षापासून जलतरणाचे धडे घेतले असून त्याला घोडेस्वारी व कुस्तीची आवड आहे. कुस्तीमध्ये त्याला 2 सन्मानचिन्ह व 2 पदके मिळालेली आहेत.