युवा पिढीने डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे संवर्धन करणे गरजेचे :अनुराधा साळुंके
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चऱ्होलीतील तक्षशिला बुद्ध विहारात अभिवादन
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी। महापरिनिर्वाण दिनानिमित्त चऱ्होली येथील तक्षशिला बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कार्यकर्ते अनुराधा साळुंके आणि दीपक साळुंके यांनी उपस्थित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. भारताचे संविधान निर्माते, मानवतावादी विचारवंत तथा बहुजनांचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस बुद्ध वंदना, त्रिसरण आणि पंचशील पठण करण्यात आले. त्यानंतर डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे महत्व अधोरेखित करणारे उद्बोधन करण्यात आले. भारतीय लोकशाहीचे बळकटीकरण, सामाजिक समानता, शिक्षणाचा प्रसार आणि मानवी हक्कांची जपणूक हे बाबासाहेबांनी दिलेले मूल्य कोणत्याही काळात तितक्याच सामर्थ्याने लागू असल्याचे साळुंके दाम्पत्यांनी सांगितले.
दीपक साळुंके यांनी आंबेडकरी चळवळीची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले. “समतामूलक समाजाची निर्मिती ही बाबासाहेबांची स्वप्ने होती. आजच्या पिढीने त्या विचारांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे,” असे ते म्हणाले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक उपस्थित होते. स्वच्छता, दीपप्रज्वलन आणि सामूहिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. परिसरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाविकांनी मोठ्या आदराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून सामाजिक बांधिलकीची पुन्हा एकदा जाणीव करून दिली.
“डॉ. आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे सामाजिक न्यायाचे सर्वात मोठे हत्यार आहे. त्यांच्या स्मृती जागवून त्यांच्या मार्गदर्शनाने पुढे जाणे हीच खरी अभिवादनाची भावना आहे.”
– अनुराधा साळुंके, सामाजिक कार्यकर्त्या.





