दौंडमध्ये राष्ट्रीय कराटे अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
युवा कराटे ट्रेनिंग सेंटर- समाज विकास प्रतिष्ठान जांभुळगावच्या खेळाडूंची दणदणीत कामगिरी
दौंड : कराटे क्रीडेला चालना देत दौंड शहरात राष्ट्रीय स्तरावरील कराटे अजिंक्यपद स्पर्धा अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडली. मार्शल आर्ट बॉक्सिंग कराटे ट्रेनिंग स्कूलच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक प्रशिक्षक संतोष सोनवणे यांच्या पुढाकाराने ३० नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा रंगली. विशेष म्हणजे एक्सर्बिया अॅबोड, जांभूळगाव येथील युवा कराटे ट्रेनिंग सेंटर तसेच समाज विकास प्रतिष्ठानच्या बालकलाकारांनी या स्पर्धेत लक्षणीय चमक दाखवत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची लयलूट केली.
स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अधिकारी व शालेय क्रीडा, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शाम भोसले यांच्या हस्ते झाले. कराटे मार्गदर्शक राजेंद्र साळवे, ओम नर्सरी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर गोडेवाल व लक्ष्मी गोडेवाल हे मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत महाराष्ट्रासह एकूण आठ राज्यांतील ५०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. विविध वयोगटातील खेळाडूंनी कराटेच्या तांत्रिक कौशल्यासह सर्वोत्तम शिस्त, एकाग्रता आणि सामन्यातील नैतिक मूल्यांचे प्रदर्शन करून प्रेक्षकांचे विशेष कौतुक मिळवले.
रोमांचक सामन्यांनंतर पदक विजेत्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांनी गौरविण्यात आले.
स्पर्धेतील माजी खेळाडूंना विशेष सन्मान देण्यात आला. कराटेच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सागर शिंदे, राजेश कलवनूर, गोविंद शिंदे, बाबू गरड, गिरिजा भालेराव यांचा गौरव करण्यात आला.
हेही वाचा – कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी! बांगलादेशने दिली कांदा आयातीस परवानगी, दरात वाढ होण्याची शक्यता
एक्सबिया अॅबोड जांभूळगावच्या युवा कराटे ट्रेनिंग सेंटरची कामगिरी :
सुवर्णपदक – गार्गी रोशन पवार, विणा विजय भोरे, अनुष्का हर्षल सिरसुलवर, विहान विजय भोरे
रौप्यपदक – भाविका नीलेश परदेशी
कांस्यपदक – वेदिका विकास भोईटे, तुषार दीपक पाटील, प्रणित प्रकाश कांबळे
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात विशाल तरस, राहुल पवार, राजू जाधव, सपना गुजर, संजय राते यांनी मोलाचे योगदान दिले. तांत्रिक समितीचे अधिकारी झहीर अन्सारी यांच्या टीमने सर्व सामने यशस्वीपणे पार पाडले. हिरालाल साळवे यांनीही सहाय्य केले.
राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा दौंडमध्ये आयोजित झाल्याने शहराचे क्रीडा मानांकन आणखी उंचावले असून कराटे खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
युवा कराटे ट्रेनिंग सेंटरचे अध्यक्ष शाम राजाराम भोसले, सचिव विशाल तरस, प्रशिक्षक योगेश खंडागळे आणि मुख्य प्रशिक्षक सुशांत ओव्हाळ व निशांत ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी हे यश संपादन केले.





