Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘महिला उद्योजिका भारताच्या विकासाचा कणा’; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महिलांचे आर्थिक सबलीकरण हाच भारताच्या विकासाचा कणा असून महिलांनी मोठ्या संख्येने उद्योग-व्यवसायात उतरावे, असे आवाहन वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उद्योजिका कार्यशाळा व प्रदर्शनात पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज आणि गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले.

पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, उत्पादन, सेवा, शेतीआधारित उद्योग आणि निर्यात अशा सर्व क्षेत्रांत महिला उद्योजिका रोजगारनिर्मिती, नवोन्मेष आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देत आहेत. या प्रयत्नांना बाजारपेठ मिळवून देण्यावर भर देण्यात येत आहे. गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस या डिजिटल पोर्टलमुळे लहान उद्योग, स्टार्टअप्स आणि विशेषत: महिला चालवित असलेल्या उद्यमांना देशभरातील सरकारी खरेदी प्रक्रियेत थेट सहभागी होता येते. छोट्या शहरातील महिला उद्योजिकेलाही आता देशातील कोणत्याही शासकीय विभागात आपला माल व सेवा पुरविण्याची संधी मिळत असल्याने गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस हा विकास आणि राष्ट्रीय मान्यतेकडे जाणारा प्रभावी मार्ग ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार महिलांच्या उद्योजकतेला बळकटी देण्यासाठी बाजार जोडणी, डिजिटल प्रवेश, आर्थिक समावेशन आणि कौशल्य विकास यावर भर देत असल्याचे पणन मंत्री रावल यांनी सांगितले. पणन विभागामार्फत आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने सुमारे २ हजार कोटी रुपयांचा मॅग्नेट हा कापणी पश्चात विकास प्रकल्प राबविण्यात येत असून, द्राक्षांपासून मनुका, प्राथमिक प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि विक्री यासारख्या उपक्रमांसाठी ६० टक्क्यांपर्यंत प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता गटांना सातत्याने बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती मिशन अंतर्गत महिला मॉल उभारले जात आहेत. जिल्हास्तरावर उभारल्या जाणाऱ्या या मॉलमध्ये केवळ महिला उद्योजकांच्या उत्पादनांनाच स्थान मिळेल, मध्यस्थांचे जाळे कमी होऊन थेट संधी उपलब्ध होईल आणि त्यामुळे ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास पणनमंत्री रावल यांनी व्यक्त केला.

महिला आरक्षण विधेयक हे केंद्र सरकारचे एक ऐतिहासिक पाऊल असून, आगामी काळात संसद व विधानमंडळांत एक तृतीयांश महिला प्रतिनिधींना महत्त्वाची स्थानं मिळाल्याने निर्णय प्रक्रियेत महिलांचा प्रभाव वाढेल. महिलेचे यश हे कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीचे साधन ठरते; ते महाराष्ट्राचे बळ आणि भारताच्या विकासकथेचा भाग आहे. त्यामुळे महिला उद्योजिकांनी आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री म्हणाले, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्वपूर्ण आहे. यावेळी गव्हर्नमेंट ई–मार्केट प्लेसचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नारायण मीना, भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयांतर्गत नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालक निधी चौधरी, महाराष्ट्र जलसंपदा विनियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्वेताली ठाकरे, पीपल्स रिपब्लिक ऑफ चीनच्या वाणिज्य दूतावासाच्या उपवाणिज्यदूत वँग अवेई, श्रीमती नीलिमा तपस्वी, टिस्सर आर्टिजन ट्रस्टच्या संस्थापक डॉ. मेघा फणसळकर, प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी, वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईच्या व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन विभागाच्या संचालिका प्रिया पानसरे, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजच्या वरिष्ठ संचालिका संगीता जैन आणि अहिल्याराणी महिला विकास व शैक्षणिक संस्थेच्या प्रतिनिधी यावेळी उपस्थित होत्या.

हेही वाचा –  पुणे महानगर क्षेत्राच्या विकासासाठी ‘ग्रोथ हब प्लॅन’ला गती

‘ब्रेकींग बॅरिअर्स : विमेन लीडिंग द फ्युचर ऑफ बिझनेस’ या विषयावर गव्हर्नमेंट ई–मार्केट प्लेसचे सत्यनारायण मीना यांचे प्रमुख भाषण झाले. त्यानंतर ‘महिला उद्योजिका : स्थानिक उद्योगातून जागतिक बाजारपेठेकडे’ या सत्रात प्रिया पानसरे, संगीता जैन, डॉ. मेघा फणसळकर, निधी चौधरी, श्वेताली ठाकरे आणि डॉ. मेघा फणसळकर आदींनी आपले विचार मांडले.

दुपारपूर्व सत्रात गव्हर्नमेंट ई–मार्केटप्लेस संदर्भात महिला उद्योजिकांसाठी शासकीय बाजारपेठ खुली करणे या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या सत्रात ई–मार्केटप्लेसची ओळख, महिला उद्योजक आणि सूक्ष्म–लघु–मध्यम उद्योगांसाठी उपलब्ध विशेष तरतुदी आदी विषयांवर महिला उद्योजिकांना माहिती देण्यात आली. त्यानंतर यशस्वी महिलांच्या उद्योगकथा मंचावर उलगडण्यात आल्या. यावेळी विविध महिला उद्योजिकांचा सन्मानही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ई–मार्केट प्लेसशी संलग्न असलेल्या शर्मिला ओसवाल (वुमनिया बॅसिलिया ऑर्गॅनिक्स प्रा. लि.), परिख भाविनी निशिथ (बुनको जुनको) आणि सौम्या कल्लुरी (सौरवी एन्टरप्रायझेस) या उद्योजिकांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला. अहिल्याराणी महिला विकास आणि शैक्षणिक संस्थेशी जोडलेल्या तेजश्री जगदीश घरत कदम, कल्पना गवारे, वैशाली वर्णे, दीपाली कुलथे, पोर्णिमा क्षीरसागर आणि सुरेखा नंदकिशोर भुसे पाटील या विविध क्षेत्रांत कार्यरत नामांकित महिलांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

निर्यात आणि उद्योजकीय प्रवास या सत्रात ई–मार्केटप्लेसवर नोंदणीकृत महिलांनी त्यांच्या यशोगाथा मांडल्या. स्थानिक सरकारी खरेदीतून हळूहळू निर्यात बाजारपेठेत प्रवेश करण्याची प्रक्रिया, त्यातील अडचणी–संधी याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

बिझनेस प्रोमोशन आणि ब्रँडिंग फॉर मार्केट एक्स्पॅन्शन या कौशल्य–विकास कार्यशाळेत अध्यक्षा निलीमा तपस्वी आणि उद्योजक तथा शास्त्रज्ञ दिनेश क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. डिजिटल आणि सोशल मीडियाचा वापर करून ब्रँडची दृश्यमानता वाढवणे, देशांतर्गत आणि निर्यात बाजारांसाठी भिन्न ब्रँडिंग धोरणे, महिला उद्योजक चालवत असलेल्या उद्योगांची बाजारातील योग्य पोझिशनिंग, तसेच संस्थात्मक आणि जागतिक खरेदीदारांसमोर विश्वासार्ह प्रतिमा निर्माण करण्याचे तंत्र हे प्रामुख्याने या सत्रामध्ये चर्चेला आले.

समारोप सत्रात ई–मार्केट प्लेसच्या प्रतिनिधींनी भागीदार संस्थांना मार्गदर्शन केले. दरम्यान, ई–मार्केट प्लेसच्या वतीने प्रत्यक्ष विक्रेता नोंदणी, प्रोफाइल तयार करण्यासंबंधी मार्गदर्शन, तक्रार–निवारण, वैयक्तिक सल्लामसलत आणि जनजागृती साहित्याचे वितरण यावेळी करण्यात आले.

या कार्यशाळा–प्रदर्शनामुळे महिला उद्योजकांसाठी ई–मार्केट प्लेस प्लॅटफॉर्मवर प्रवेश सुलभ होणे, शासकीय खरेदी प्रक्रियेबाबत जागृती वाढणे, ब्रँडिंग आणि निर्यातसिद्धतेबाबत क्षमतावृद्धी होणे, तसेच धोरणकर्ते, उद्योगनेते आणि मार्गदर्शक यांच्याशी थेट नेटवर्किंगची संधी उपलब्ध झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button