पुण्यानंतर ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे देशात कुठे कुठे आंदोलन? संस्थापक अभिजित दिपके यांनी सांगितले नियोजन..

पुणे | ‘नीट’ (NEET), सीबीएसई (CBSE) यांसह विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधील पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप आहे. या परीक्षांमधील गैरप्रकारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज दुपारी ४ वाजल्यापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात शांततापूर्ण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून, पुण्यातून सुरू झालेले हे आंदोलन भविष्यात नागपूर, लखनौ आणि बेंगळुरू येथेही केले जाणार आहे.
या आंदोलनाला विख्यात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, डॉ. विश्वंबर चौधरी, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी जाहीर पाठिंबा दिला असून, सोनम वांगचुक स्वतः या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना अभिजित दिपके म्हणाले, “देशात जेव्हा जेव्हा आंदोलने झाली, तेव्हा तेव्हा आंदोलनकर्त्यांना बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. आपण आंदोलनाच्या माध्यमातूनच स्वतंत्र झालो आहोत, त्यामुळे लोकशाहीत आंदोलनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आम्हाला ‘फेक’ म्हणण्यापेक्षा व्यक्त होणाऱ्या तरुणांचे म्हणणे सरकारने समजून घेतले पाहिजे. मात्र, हे सरकार या गंभीर विषयावर चर्चा करण्यास तयार नाही.”
देशभरातील १ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांवर परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे अन्याय झाला असल्याचा आरोप त्यांनी केला. “शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरत आहोत. आमची भूमिका आणि विचार समाजमाध्यमांवरून दडपण्याचा प्रयत्न होत आहे,” असे सांगत त्यांनी या लढ्यात धोरणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासक मंडळी सोबत असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा
मोशीतील काजळे पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
लोकशाही वाचवण्यासाठी जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही: डॉ. विश्वंबर चौधरी
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंबर चौधरी यांनी या आंदोलनाला पाठिंबा देताना सांगितले की, “अभिजित दिपके यांनी सुरू केलेले हे आंदोलन महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अहिंसक व घटनात्मक विचारांवर आधारित आहे. सध्याच्या परिस्थितीत लोकशाही वाचवण्यासाठी जनआंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा आंदोलनांची समाजात विश्वासार्हता निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.”
सत्ताधाऱ्यांमध्ये चुका मान्य करण्याची प्रवृत्ती नाही: अॅड. असीम सरोदे
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी सरकारच्या भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “परीक्षांमधील गैरव्यवस्था आणि पेपरांच्या घोळामुळे आज विद्यार्थ्यांचे जीव जात आहेत, तरीही सरकार यावर गंभीरपणे प्रतिसाद देताना दिसत नाही. स्वतःच्या चुका मान्य करून देशाची माफी मागण्याची प्रवृत्ती सत्ताधाऱ्यांमध्ये दिसून येत नाही. सरकारने या संवेदनशील प्रश्नावर तातडीने आणि गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे.”
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने या मोठ्या लढ्याची सुरुवात पुण्यातून होत असून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पुकारलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.





