महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार? बड्या नेत्याने वर्तवले खळबळजनक भाकीत

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात गेल्या चार वर्षांपासून सत्तेसाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे. जून 2022 मध्ये शिवसेना फुटली, जेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केले.
त्यानंतर जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, जेव्हा अजित पवार यांच्यासह 40 आमदार भाजप-शिंदे सरकारसोबत गेले. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय आमदार भाजपच्या गळाला लागले.
आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. आगामी आठ दिवसांत भाजप आपल्या मित्रपक्षांवर मोठा डाव टाकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी हा दावा केला. ते म्हणाले, “भाजपचा आजवरचा इतिहास पाहिला तर त्यांनी नेहमीच आपल्या मित्रपक्षांना संपवण्याचे काम केले आहे. आताही भाजप आपल्या मित्रपक्षांवर डाव टाकत आहे. आगामी पाच राज्यांतील निवडणूक निकालांपूर्वीच ‘ऑपरेशन लोटस’ पूर्णत्वास जाणार आहे.”
हेही वाचा – “अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार”; देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
गेल्या काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बडे नेते, आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता.
याबाबत विचारणा केल्यावर नाना पटोले म्हणाले, “भाजपचा इतिहासच असा आहे की, त्यांनी मित्रपक्षांना संपवले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचे फारसे भवितव्य दिसत नाही. त्यांचे नेते भाजपमध्ये गेले तर नवल वाटण्याचे कारण नाही. याची सुरुवात झाली आहे.” पटोले यांनी पुढे म्हटले, “जर असे झाले तर राज्यात यापुढे फक्त भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष शिल्लक राहतील.”
नाना पटोले यांनी आपल्या पूर्वीच्या भाकिताची आठवण करून दिली. ते म्हणाले, “येत्या काळात भाजपकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा गेम केला जाणार असल्याचे मी आधीच बोललो होतो. आणखी मोठा खेळ शिल्लक आहे. फक्त आठ दिवस थांबा, हे तुम्हाला दिसेल.” ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्राची जनता भाजपच्या या खेळाला कंटाळली आहे. त्यांना पुन्हा सत्तेवर काँग्रेस हवी आहे. मात्र, त्यासाठी सरकारने बॅलेटवर मतदान घेतले पाहिजे.”
नाना पटोले यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली असून, आगामी आठ दिवसांत काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





