बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपाचा मुख्यमंत्री होणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ठरला

Nitish Kumar | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यसभेत जाणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपाचा मुख्यमंत्री विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी बुधवारी, १५ एप्रिल रोजी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. बिहारसारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांनी हे पद सोडून राज्यसभा सदस्य होण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, आता त्यांच्या राजीनाम्यानंतर त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून त्यांच्या राज्यसभेवर जाण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
भाजपाचा पहिला मुख्यमंत्री होणार?
नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये भाजपाचा पहिला मुख्यमंत्री विराजमान होण्यासाठी सर्व तयारी सुरू झाली आहे. १९६२ साली तेव्हाच्या भारतीय जनसंघानं बिहारमध्ये पहिल्यांदाच तीन जागा जिंकल्या होत्या. तेव्हापासून भाजपानं राज्यात सातत्याने राजकारण केलं असलं, तरी मुख्य पद मात्र त्यांच्या हाती आले नव्हते. आता नितीश कुमार राज्यसभेत जात असताना भाजपाच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्याचं मानलं जात आहे.
हेही वाचा : होर्मुझ ओलांडण्यासाठी भारतीय जहाजांना टोल? इराणचे अधिकृत स्पष्टीकरण
उद्या शपथविधी; मोदी उपस्थित राहण्याची शक्यता
माध्यमांतील वृत्तानुसार, नितीश कुमार यांनी आज राजीनामा दिल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी बुधवारी, १५ एप्रिल रोजी होऊ शकतो. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे इतर राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. इतर मान्यवर मंडळीही या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात.
सम्राट चौधरी आघाडीवर; निशांत कुमार उपमुख्यमंत्री?
एनडीएतील सूत्रांच्या माहितीनुसार, विद्यमान उपमुख्यमंत्री व भाजपाचे आमदार सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्याचवेळी, नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांचा बिहारच्या राजकारणात औपचारिक प्रवेश होण्याची शक्यता असून ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, अशीही चर्चा सुरू आहे.
दरम्यान, जनता दल (युनायटेड) अर्थात जदयूने सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री असावा, अशी भूमिका मांडण्याची तयारी केल्याचं सांगितलं जात आहे. सध्या बिहारमध्ये सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा हे भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री आहेत.





