कल्याण-डोंबिवलीची वाहतूक कोंडी सुटणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : कल्याणच्या फडके मैदानात राजकीय आणि विकासाच्या गप्पांचा धुराळा उडाला. MCHI प्रॉपर्टी प्रदर्शनात उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट हेलिकॉप्टरने धावती भेट दिली. एकनाथ शिंदेंनी मेट्रो, समृद्धी महामार्ग, काळू धरण आणि लाडक्या बहिणी योजनेवरून मोठं भाष्य केलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मी आज माणगाव-महाडमध्ये होतो. तिथून हेलिकॉप्टरने थेट ठाण्याला उतरणार होतो. पण मी तुम्हाला शब्द दिला होता. पायलटने सांगितले की, २० मिनिटे लागतील, मी थेट कल्याणला उतरलो. मी जे कमिट करतो ते पाळतो, तिथे मी स्वतःचही ऐकत नाही’.
कल्याण-डोंबिवलीच्या वाहतूक कोंडीवरही शिंदेंनी महत्वाचं भाष्य केलं. मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर) च्या डिझाइनमध्ये बदल केल्याचे शिंदेंनी सांगितले. भिवंडी रांजणोली ते थेट महापे या मेट्रोमुळे कल्याण-डोंबिवलीची वाहतूक कोंडी कायमची संपेल. त्याचबरोबर आमने जवळून जाणारा रस्ता समृद्धी महामार्गाला जोडून कल्याणला मोठी कनेक्टिव्हिटी देणार आहोत,” अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
हेही वाचा – गौतम अदानींची मोठी घोषणा, ‘या’ प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
कल्याणच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून ‘काळू धरण’ बांधले जात आहे. MMRDA ने ४५० कोटी रुपये भरलेत. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या धरणावर शिंदे म्हणाले, “MCHI ने रस्ते बनवायला घ्यावे, आम्ही २ FSI देऊ, यात लोकांचाही फायदा होईल’.
‘रिअल इस्टेट हे शेतीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार देणारे क्षेत्र आहे. कोविड काळात विकासक व्हेंटिलेटरवर होते. तेव्हा आम्ही प्रीमियम आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत दिली. ठाण्याला जे विकासाचे निकष लावले आहेत. तेच कल्याण-डोंबिवलीला लागू करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे, असं शिंदे यांनी सांगितले.





