To The Point : राष्ट्रवादीमधील संधीसाधु नेत्यांमुळे निष्ठावंताची ‘गळचेपी’; महेश लांडगेंना रोखणार कोण?
लांडे, भोईर यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे घिरट्या

काटे, बहल, कदम, कलाटे यांच्यासारख्या निष्ठावंतांना न्याय कधी?
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
सात महिन्यांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय चित्र पालटले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहरातील नेत्यांनी पुन्हा एकदा राजकारणात स्थिरस्थावर होण्यासाठी कोलांटउड्या मारायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीमध्येच स्थानिक पातळीवर आता गटातटाचे राजकारण पाहायला मिळत असून, दलबदलू नेत्यांनी सोयीचे राजकारण करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे निष्ठावंतांची मात्र गळचेपी झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. अखंड राष्ट्रवादीमध्ये त्यावेळी पिंपरी पालिकेत अजित पवार म्हणतील ती दिशा होती. मात्र या एकहाती सत्तेला शहरातील आमदार महेश लांडगे आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी सुरुंग लावला. महापालिका निवडणुकीमध्ये पुढाकार घेत या दोघांनी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला. त्यानंतर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस सैरभैर झालेली असतानाच राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये फारकत निर्माण झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेतेही विभागले गेले आहेत.
नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या.या निवडणुकांपूर्वी राज्यातील चित्र वेगळे होते. अनेकांनी पक्ष बदलले. आपले नेते देखील बदलले. विधानसभेचे निकाल लागले आणि अपेक्षेप्रमाणे विरोधकांना पुन्हा एकदा मोठा धक्का सहन करावा लागला. यामध्ये स्थानिक पातळीवरील राजकारण मात्र ढवळून निघाले. ज्या नेत्यांच्या वळचणीला जाऊन बसले त्या नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची हवा होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तोच ट्रेंड राहील या अपेक्षेने महाविकास आघाडीत गेलेल्या इच्छुक आमदारांचे मात्र मनसुबे पाण्यात बुडाले.
आता पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्ष पद मिळाले. त्यामुळे या संधीचा फायदा घेत शरद पवारांचे बोट धरलेले विलास लांडे आणि भाऊसाहेब भोईर आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या पंगतीला बसण्याची धडपड करीत आहेत. ‘अण्णा आमचे नेते’ याच अविर्भावात वावरत आहेत. याची प्रचिती नुकताच अण्णा बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला त्या कार्यक्रमात आली. या ठिकाणी अक्षरशः घरचा कार्यक्रम असल्यासारखे माजी आमदार विलास लांडे वावरत होते. विलास लांडे यांच्या क्रेडिट घेण्याच्या वृत्तीमुळे भोसरीतील रवी लांडगे, अजित गव्हाणे या नेत्यांची मोठी गोची झाली आहे. या दोघांची ही स्पेस विलास लांडे यांनी व्यापली आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र मंगल कलश यात्रा काढली. ही यात्रा भोसरी मतदारसंघातून रवाना झाली. यावेळी देखील लांडे यांची अजित पवार यांच्यासमोर आपली विश्वासार्हता दाखवण्याची धडपड सुरू होती., असं निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.
हेही वाचा : महाराष्ट्राला पर्यटनात अव्वल आणण्याचा संकल्प; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संधीसाधुंना अजित पवार संधी देतील काय?
पिंपरी चिंचवड महापालिका हे या शहराचे ”एम” टॉनिक आहे. त्यामुळे या महापालिकेवर निर्विवाद सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नांची परकाष्ठा करत आहेत. यामध्ये राज्यातील नेते देखील स्थानिक मंडळींना बळ देताना नेहमीच दिसतात. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या महापालिकेचा एकेकाळी 15 वर्ष गड सांभाळलेले अजित पवार महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला बळ देतील असा अनेकांचा कयास आहे. त्यामुळे अनेक संधीसाधू या शहरातून अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. यातून पक्षातील निष्ठावंतांना मात्र संधी मिळत नसल्याचे चित्र आहे ज्यामध्ये माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे, माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसेवक मयूर कलाटे, माजी महापौर मंगला कदम यांच्यासारख्या निष्ठावंतांचा समावेश आहे. दलबदलू नेत्यांमुळे या निष्ठावंतांना संधी मिळत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. पण अशा संधी साधून नेत्यांना अजित पवार ताकद देतील काय? की अण्णा बनसोडे यांच्याप्रमाणे निष्ठावंतांना संधी देऊन राजकारणाची परिभाषा बदलतील का? राष्ट्रवादीच्या वर्तुळात सुरू आहे.
अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात तुलना कशामुळे?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1992 पासून पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी हातभार लावला. किंबहुना, पिंपरी-चिंचवड म्हणजे अजित पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख होती. मात्र, 2017 मध्ये महानगरपालिकेत राष्ट्रवादीला पराभव पहावा लागला. तत्पूर्वी, 2014 मध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही मतदार संघांमध्ये राष्ट्रवादीचे पानीपत झाले होते. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे हे शहरातील राष्ट्रवादीचा गड ढासळण्यास कारणीभूत ठरले. आता जगताप यांच्यानंतर शहराचे नेतृत्व म्हणून महेश लांडगे प्रभावीपणे काम करीत आहेत. 2014 पासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे लांडगे यांनी विकासकामांचा धडाका लावला. शहराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प कार्यान्वयीत केली. आक्रमक हिंदूत्व आणि विकासात्मक वाटचाल अशी महेश लांडगे यांनी ओळख अधोरेखित झाली. सहाजिकच, अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात शहराच्या विकासासाबाबत तुलना होवू लागली.
अजित पवार यांना हवा विकासाभिमूख हिंदुत्वाचा नवा चेहरा…
महेश लांडगे यांचे विकासाभूमिक आणि आक्रम हिंदूत्व आणि अजित पवार यांनी 1992 पासून 2014 पर्यंत केलेली विकासकामे अशी तुलना सुरू झाली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या भूमिपूजन समारंभात यावर खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झाले. शहराच्या विकासाचे श्रेय महेश लांडगे यांनी जाहीर व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. व्यासपीठावर अजित पवार उपस्थित असताना त्यांचे नाव विकासकामांच्या श्रेयात घेतले नाही. याबाबज अजितदादांनी जाहीरपणे खंत व्यक्त केली. त्यामुळे अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असा सामना जनमानसामध्ये चर्चेत येवू लागला. प्रचंड ताकद आणि निर्विवाद सत्ता असतानाही पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांच्या मुद्यांवर अजित पवारांपेक्षा महेश लांडगे यांचे पारडे जड वाटते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महेश लांडगे यांच्या ‘स्पीड’ला ‘चेस’ करण्यासाठी अजित पवार यांना स्थानिक पातळीवर आक्रमक व विकासाभिमूख हिंदूत्वाच्या मुद्यावर स्वत:ला सिद्ध करणारा नवा चेहरा हवा आहे. आण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्षपदी संधी देवून अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची पाळेमुळे घट्ट करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, बनसोडे यांची कार्यपद्धती आणि शहरातील राष्ट्रवादीची स्थिती पाहता त्यामध्ये यश मिळेल, असे दिसत नाही.
महेश लांडगे यांच्याशी टक्कर कोण देईल?
विकासाभिमूख हिंदूत्वाच्या मुद्यावर आमदार महेश लांडगे यांना तोडीस तोड प्रभावी चेहरा सध्यस्थितीला पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत नाही. कारण, 2014 पासून स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोटचेपी भूमिका घेतली. एक विचार धरुन राजकीय वाटचाल केली नाही. सोयीचे आणि बेरजेचे राजकारण असा स्थानिक नेत्यांचा कल राहिला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम राष्ट्रवादीला पहायला मिळाले. शहरात प्रचंड काम असतानाही भाजपाच्या तुलनेत राष्ट्रवादी पिछाडीवर राहिली. आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत माजी आमदार विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांना आव्हान उभा करण्यासाठी दस्तुरखुद्द अजित पवार यांची मूक संमत्ती होती, असे सांगितले जाते. तरीही माजी आमदार विलास लांडे, शिवसेनेच्या सुलभा उबाळे, राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे ही मंडळी विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे यांना रोखण्यात ‘निष्प्रभ’ ठरली आहेत. ‘रिंगआउट’ झालेल्या खेळाडुवर नवा डाव लावण्याची चूक उपमुख्यमंत्री अजित पवार करतील का? असा प्रश्न आहे. कारण, माजी आमदार विलास लांडे ज्याप्रकारे राष्ट्रवादीत सक्रीय झाले आहेत. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ता अस्वस्थ झाला आहे. विकास आणि हिंदूत्व या मुद्यांवर महेश लांडगे यांची बरोबरी लांडे, भोईर, गव्हाणे करु शकत नाहीत. त्यामुळे नाना काटे, योगेश बहल किंवा मयूर कलाटे अशा नव्या चेहऱ्यांमधून विकास आणि हिंदूत्वाच्या मुद्यावर आमदार महेश लांडगे यांना प्रभावी पर्याय राष्ट्रवादीला तयार करावा लागणार आहे.