‘आता राज ठाकरे पुढचा निर्णय घेतील’; मनसे-शिवसेना युतीवर शिवसेना नेत्याचं सूचक वक्तव्य

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. या चर्चेला आता पुन्हा एकदा गती मिळाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
आमदार अनिल परब म्हणाले, की राज ठाकरे यांना वाटलं की शिवसेनेबरोबर (ठाकरे) युती झाली पाहिजे. त्यानंतर आम्ही देखील त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. आता राज ठाकरे यांनी युतीबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. कोणाशी युती करायची आणि कोणाशी नाही हे त्यांनी ठरवावं. आम्हाला वाटलं की राज ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी बोलले आणि आम्ही देखील त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. शिंदेंच्या शिवसेनेबरोबर युती करावी, भाजपाबरोबर युती करावी आणि त्यातून राज्याचं हित साधलं जाईल असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी तसा निर्णय घ्यावा. तो त्यांचा प्रश्न आहे.
हेही वाचा : प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा व ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ वितरण समारंभ
आता सर्वांचे लक्ष राज ठाकरे यांच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा नारा दिला होता. त्यांनी कार्यकर्त्यांना युतीची वाट न पाहता निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीबाबत त्यांनी कधीच पूर्णपणे नकार दिलेला नाही. त्यामुळे, आता राज ठाकरे काय निर्णय घेतात, यावर युतीचे भवितव्य अवलंबून आहे.