‘भारतीय जनता पक्षात ज्या नावांची चर्चा असते ते मुख्यमंत्री होत नाहीत’; विनोद तावडे यांचं विधान चर्चेत

Vinod Tawde | महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यात विविध मतदारसंघात सभा आणि मेळावे सुरु आहेत. यातच महायुतीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मोठं विधान केलं आहे.
विनोद तावडे नेमकं काय म्हणाले?
विधानसभेच्या निवडणुकीत महायुती जिंकेल आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल. भारतीय जनता पक्षात ज्या नावाची चर्चा मुख्यमंत्रिपदासाठी होते. ते कधी मुख्यमंत्री होत नाहीत. हे पक्क लक्षात ठेवा. काही काळजी करू नका. तुम्हाला राजस्थानचे भजनलाल शर्मा माहिती होते? मोहन यादव माहिती होते? ओडीशाचे माहिती होते का? त्यामुळे माझ्या नावाची चर्चा झाली ना? याचा अर्थ मी नक्की होणार नाही हे ठरवा. बाकी बघू, असं विनोद तावडे म्हणाले.
हेही वाचा – बालगंधर्व रंगमंदिर येथे मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुती आणि महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. त्यामुळे आता निवडणुकीनंतर नेमकी कोण मुख्यमंत्री होतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.





