‘मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध’; काँग्रेस नेत्याचं विधान

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. छगन भुजबळ यांनी आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, असं म्हटलं आहे. दरम्यान यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरसकट कुणबी प्रमापत्राला विरोध असल्याचं म्हटलं आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. सरसकट आरक्षण देण्यास आमचा आधीही विरोध होता आणि आत्ताही आहे. कुणबी नोंदणीचं काम शिंदे समितीला दिलं आहे. ओबीसींमध्ये समाविष्ट होणाऱ्या जाती त्यांनी शोधाव्या आणि श्वेतपत्रिका काढावी.
आम्ही राणे समिती स्थापन केली होती. त्यानंतर गायकवाड समिती आली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की कोणतीही जात मागास ठरवायची असेल तर त्यासाठीची प्रक्रिया आहे. ती राबवली गेली पाहिजे. जर सिद्ध झालं की ते मागास आहेत तर त्यांना आरक्षण द्यायला कुणाचीच ना नाही. छगन भुजबळ एक भूमिका मांडत आहेत आणि शंभूराज देसाई वेगळं बोलत आहेत. असं असू नये, लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काश्मिरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
महाराष्ट्रातील कुणबींच्या नोंदी तपासण्यात येत आहेत. आता जी मागणी येते आहे की सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या. यावर सरकारची भूमिका काय? ते स्पष्ट झालं पाहिजे. मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढाई यांना लावायची आहे का? मी ओबीसी आहे मला हेच वाटतं की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास माझा याआधीही विरोध होता आणि आत्ताही आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या विदर्भात होतात. ते कोण आहेत? ते ओबीसी आहेत. का होतात? कारण ओबीसीमुळे सर्व काही मिळतं अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं गेलं. अरे हेच समाजाला अपुरं आहे. तुम्ही येणार तर वाढवून घ्या. वेगळा प्रवर्ग घ्या. तुम्ही ५० टक्केच्या आतमध्येची मागणी करताय. हा निर्णय सरकारने जाहीर केलाय. मग वाढवून द्या. ओबीसी समाजाला दुखवू नका. मराठा समाजालाही दुखवू नका. गरीब मराठा समाजाला न्याय मिळावं अशी आमचीदेखील भूमिका आहे. सरकार सरकार म्हणून जी भूमिका मांडायला हवं ती मांडताना दिसत नाही, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.





