PM मोदींना प्रश्न विचारणं पडलं महागात! नॉर्वेच्या पत्रकाराचे सोशल मीडिया अकाऊंट्स निलंबित

Hele Leng Svensen | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युरोप दौऱ्यादरम्यान त्यांना भारतीय प्रेस स्वातंत्र्याबद्दल प्रश्न विचारणाऱ्या नॉर्वेच्या महिला पत्रकार हेले लेंग स्वेन्सेन (Hele Leng Svensen) यांना मोठा धक्का बसला आहे. पीएम मोदींना प्रश्न विचारल्यानंतर अवघ्या काही वेळातच ‘मेटा’ (Meta) कंपनीने हेले लेंग यांचे अधिकृत फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट निलंबित (Suspend) केले आहे. या धक्कादायक प्रकाराची माहिती स्वतः लेंग यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरून दिली आहे.
हेल लेंग या ओस्लो येथील ‘दगासाविसेन’ (Dagsavisen) या नामांकित वृत्तपत्रासाठी कार्यरत आहेत. लेंग यांनी ‘एक्स’वर अकाऊंट निलंबित झाल्याच्या कथित नोटीसचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले, “अकाऊंट निलंबित होण्यापूर्वी संपूर्ण दिवस मी ते वापरू शकत नव्हते. प्रेस स्वातंत्र्यासाठी (प्रेस फ्रीडम) मोजावी लागलेली ही एक छोटीशी किंमत आहे, पण मी माझ्या आयुष्यात यापूर्वी असा अनुभव कधीच घेतला नव्हता.”

हेही वाचा
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आरसीसीच्या फलकाची तोडफोड
दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “मेटा मालकीच्या प्लॅटफॉर्मवरून माझ्याशी संपर्क साधू इच्छिणाऱ्या सर्व युजर्सना मी सांगू इच्छिते की, माझे इन्स्टाग्राम आणि फेसबुक दोन्ही अकाऊंट्स निलंबित करण्यात आले आहेत. मला जास्तीत जास्त भारतीय युजर्सना उत्तरे द्यायची होती, परंतु आता माझ्या उत्तरांना उशीर होईल. मला आशा आहे की मला माझे अकाऊंट्स लवकरच परत मिळतील.”
नेमका वाद काय होता?
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोप दौऱ्यावर असून नॉर्वेच्या भेटीदरम्यान त्यांनी तेथील पंतप्रधान जोनस स्टोर यांच्यासोबत एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ही परिषद संपवून पंतप्रधान मोदी जेव्हा खोलीबाहेर जात होते, तेव्हा पत्रकार हेले लेंग यांनी ओरडून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, “तुम्ही जगातील सर्वात स्वतंत्र प्रेसकडून काही प्रश्न का घेत नाही?” पंतप्रधान मोदींनी त्यांचा हा प्रश्न ऐकला की नाही, हे स्पष्ट झाले नसले तरी या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
कृतीचे केले समर्थन; जागतिक क्रमवारीचा दिला हवाला
हा वाद वाढल्यानंतर लेंग यांनी एक्स (X) वर आपल्या कृतीचे समर्थन केले. पंतप्रधान मोदी आपल्या प्रश्नाचे उत्तर देतील अशी मला आधीपासूनच अपेक्षा नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. याच वेळी जागतिक प्रेस स्वातंत्र्य क्रमवारीचा (World Press Freedom Index) हवाला देत त्यांनी लिहिले की, “प्रेस स्वातंत्र्याच्या यादीत नॉर्वे पहिल्या स्थानावर आहे, तर भारत १५७ व्या स्थानावर आहे.” मात्र, या संपूर्ण घडामोडीनंतर थेट त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट्सच बंद झाल्याने जागतिक पातळीवर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.





