ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत इंटरनेट व टीव्ही केबल्सविरोधात महापालिकेचा इशारा

महापालिकेच्या विद्युत खांबांवर परवानगीशिवाय टाकलेल्या केबल्समुळे सुरक्षेचा प्रश्न

ऑपरेटर्सना ३० दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावरील दिवाबत्तीच्या खांबांवर काही संस्था आणि व्यक्तींनी पूर्वपरवानगीशिवाय टीव्ही तसेच इंटरनेट केबल्स टाकल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने महापालिकेने संबंधित केबल ऑपरेटर्स आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांना ३० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागाने स्पष्ट केले की, महानगरपालिकेच्या खांबांवर केबल टाकण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. अनधिकृतपणे ओढण्यात आलेल्या केबल्समुळे दुर्घटना होण्याची शक्यता असून, विद्युत खांब व त्यावरील यंत्रणांचे नुकसान झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

याशिवाय, शहराच्या सौंदर्यावरही या केबल्सचा विपरीत परिणाम होत असून, नागरिक, सामाजिक संस्था तसेच लोकप्रतिनिधींनी याबाबत महापालिकेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार, पूर्वपरवानगीशिवाय टाकण्यात आलेल्या केबल्सना महापालिकेच्या मालमत्तेवरील अतिक्रमण मानले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा

मंगलाताई कदम यांची राष्ट्रवादी पक्षामधून हकालपट्टी करा : रवींद्र ओव्हाळ

महापालिकेने स्पष्ट केले की, कोणतीही केबल टाकण्यासाठी प्रथम परवाना विभागाकडून रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवाना मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीद्वारे उभारण्यात आलेल्या ऑप्टिकल फायबर केबल (OFC) नेटवर्कचा वापर करणे किंवा त्या डक्टमधून केबल टाकणे आवश्यक राहील.

सर्व संबंधित केबल ऑपरेटर्स आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांनी वैध परवाना, जीएसटी किंवा एमएसएमई प्रमाणपत्र, कार्यालयाचा पत्ता व शॉप अॅक्ट परवाना, केवायसी कागदपत्रे, हमीपत्र, केबल मार्गाचा तपशील, शुल्क भरल्याच्या पावत्या आणि महापालिकेच्या परवान्याच्या प्रती यांसह सर्व आवश्यक कागदपत्रे ३० दिवसांच्या आत महापालिकेच्या विद्युत विभागात सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

निर्धारित मुदतीत माहिती व कागदपत्रे सादर न करणाऱ्या ऑपरेटर्सविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तसेच अशा कारवाईमुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीसाठी संबंधित केबल ऑपरेटर्स जबाबदार राहतील, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button