‘राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचा फोन आला होता, पण..’; वसंत मोरेंचं स्पष्टीकरण
पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायर ब्रँड वसंत मोरे यांनी काल मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. वसंत मोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर मनसेकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. कोणत्याही नेत्याने यावर भाष्य केलेलं नाही. यानंतर आज वसंत मोरे यांनी राज ठाकरेंचा फोन आल्याचे सांगितले.
वसंत मोरे म्हणाले की, मनसेचा राजीनामा दिल्यानंतर मला अनेक पक्षातील नेत्यांचे फोन आले. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातूनही मला संपर्क केला गेला. पण सर्वच पक्षांना मी सांगितलं की, सध्यातरी मी कोणतीही राजकीय भूमिका जाहीर करणार नाही. कारण मला ज्या त्रासातून पक्ष सोडावा लागला, त्यानंतरही ती लोक शहाणी होत नाहीत. ती लोकं अजूनसुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना रात्री-अपरात्री फोन करून धमकावत आहेत. या सर्व गोष्टीतून स्थिर स्थावर होण्यासाठी मला काही दिवसांचा वेळ जाईल. त्यातून बाहेर पडल्यावर मी पुढचा निर्णय घेईल.
हेही वाचा – ‘राहुल गांधी वीर सावरकरांच्या भूमीत येत आहेत, त्यांचं..’; संजय राऊतांचं विधान
मनसेमधून मला अनेकांचे फोन आले. राज साहेबांचाही फोन एका पदाधिकाऱ्याच्या मोबाइलवर आला होता. पण त्या पदाधिकाऱ्याला मी एवढंच सांगितलं की, मी हात जोडतो. पण साहेबांचा फोन मला देऊ नको. कारण आजवर संघटनेतील खरी परिस्थिती मी राज ठाकरे यांच्या कानावर घालत आलो. त्यामुळे आता राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्याशी बोलून त्यांना दुखवू इच्छित नाही, असंही वसंत मोरे म्हणाले.